अलूर (बंगळुरू) : सुवेद पारकरने भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधून घेताना मंगळवारी रणजी क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडविरुद्ध विक्रमी द्विशतक ठोकले. त्याने पदार्पणातच ही खेळी करत मुंबईच्या भल्या मोठ्या धावसंख्येत मोलाची भूमिका बजावली. त्याच्या जोरावर मुंबईने आपला पहिला डाव १६६.४ षटकांत ८ बाद ६४७ धावांवर घोषित केला. सुवेद प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पणात द्विशतक ठोकणारा १२ वा, तर केवळ दुसरा मुंबईकर ठरला.
योगायोग म्हणजे, सुवेदच्या आधी असा पराक्रम माजी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांनी केला होता आणि सध्याच्या मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा मुझुमदार यांच्याच खांद्यावर आहे. यावेळी मुझुमदार यांनी ड्रेसिंग रूममधून सुवेदच्या विक्रमी खेळीचा आनंद घेतला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २१ वर्षीय सुवेदने कोणतेही दडपण न घेता शतकाचे द्विशतकात रूपांतर केले. त्याने कोणताही धोका न पत्करता शांतपणे उत्तराखंडच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. सुवेदने ४४७ चेंडूंत २१ चौकार आणि ४ षटकारांसह २५२ धावा फटकावल्या.
प्रथम श्रेणी पदार्पणातील विक्रमी खेळी :
साकिबुल गनी (बिहार) : ३४१ धावा (मिझोरमविरुद्ध, २०२१-२२)
अजय रोहेरा (मध्य प्रदेश) : नाबाद २६७ धावा (हैदराबादविरुद्ध, २०१८-१९)
अमोल मुझुमदार (मुंबई) : २६० धावा (हरयाणाविरुद्ध, १९९३-९४)
सुवेद पारकर (मुंबई) : २५२ धावा (उत्तराखंडविरुद्ध, २०२१-२२)
अर्सलान खान (चंडीगड) : २३३ धावा (अरुणाचल प्रदेशविरुद्ध, २०१९-२०)
गुंडप्पा विश्वनाथ (म्हैसूर) : २३० धावा (आंध्र प्रदेशविरुद्ध, १९६७-६८)
मयांक राघव (मणिपूर) : २२८ धावा (नागालँड, २०१८-१९)
पवन शाह (महाराष्ट्र) : २१९ धावा (आसामविरुद्ध, २०२१-२२)
जीवनजोत सिंग (पंजाब) : २१३ धावा (हैदराबादविरुद्ध, २०१२-१३)
अंशुमन पांड्ये (मध्य प्रदेश) : नाबाद २०९ धावा (उत्तर प्रदेशविरुद्ध, १९९५-९६)
अभिषेक गुप्ता (पंजाब) : २०२ धावा (हिमाचल प्रदेशविरुद्ध, २०१७-१८)
मनप्रीत जुनेजा (गुजरात) : २०१ धावा (तामिळनाडूविरुद्ध, २०११-१२)
Web Title: Suved Parkar's record batting; The second Mumbaikar to hit a double century in his first class debut
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.