नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज उमेश यादव स्नायूदुखीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन कसोटी सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन तिसऱ्या कसोटीसाठी त्याच्या स्थानावर वेगवान गोलंदाज टी. नटराजनऐवजी जास्त अनुभवी शार्दुल ठाकूर याला संधी देऊ शकते.उमेश यादव मेलबर्नमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान जखमी झाला होता. त्यामुळे तो मालिकेतून ‘आऊट’ झाला आहे आणि तो रिहॅबिलिटेशनसाठी मायदेशी परतेल. तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनीत खेळवला जाणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले, ‘‘उमेशला रिहॅबिलिटेशन कार्यक्रमातून जावे लागेल. तो भारताकडे रवाना झाला आहे.’’ सूत्राने सांगितले, ‘टी. नटराजन याने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे, परंतु त्याने तामिळनाडूतर्फे केवळ एकमेव प्रथम श्रेणी सामना खेळला आहे, हे विसरता येणार नाही. दुसरीकडे शार्दुल ठाकूर हा मुंबईतर्फे सातत्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे.’
सूत्रांनी सांगितले की, ‘शार्दुल कमनशिबी होता. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात एकही षटक पूर्ण न करता बाहेर व्हावे लागले होते. तो अंतिम ११ खेळाडूंमध्ये उमेशचे स्थान घेऊ शकतो.
एमसीजी ऑनर्स बोर्डवर दुसऱ्यांदा रहाणेचे नाव
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारताच्या विजयाचा शिल्पकार कर्णधार अजिंक्य रहाणेचे नाव शानदार शतकी खेळीसाठी दुसऱ्यांदा एमसीजीच्या ऑनर्स बोर्डवर लिहिल्या गेले आहे. एमसीजीवर शतक झळकाविणाऱ्या फलंदाजांना व पाच बळी घेणाऱ्या गोलंदाजांना ऑनर्स बोर्डवर स्थान मिळते. रहाणेचे नाव दुसऱ्यांदा या बोर्डवर लिहिल्या गेले आहे. २०१४ मध्ये रहाणेने एमसीजीवर १४७ धावांची खेळी केली होती.