मुंबई - शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल् अत्यंत रोमहर्षक सामन्यात हिमाचल प्रदेशवर ३ चेंडू आणि तीन विकेट्स राखून मात करत मुंबई सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. हिमाचल प्रदेशने दिलेल्या १४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची अवस्था ७ बाद ११९ अशी झाली होती. मात्र सरफराज खान आणि तनुष कोटियान यांनी आठव्या विकेटसाठी २७ धावा जोडत मुंबईला ३ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यानंतर मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर हिमाचल प्रदेशची दाणादाण उडाली. मुंबईकडून मोहित अवस्थी आणि तनुष कोटियान यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत हिमाचलच्या डावाला सुरुंग लावला. त्यामुळे हिमाचल प्रदेशला २० षटकांमध्ये ८ बाद १४३ धावांपर्यंतच मजल मारता आली.
या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातही निराशाजनक झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे (१) आणि पृथ्वी शॉ (११) धावा काढून बाद झाले. त्यानंतर यशस्वी जयस्वाल (२७) आणि श्रेयस अय्यर (३४) यांनी मुंबईचा डाव सावरला. मात्र हे दोघेही बाद झाल्यावर मुंबईचा डाव गडगडला आणि मुंबईची अवस्था ७ बाद ११९ अशी झाली. मात्र सर्फराज खान (नाबाद ३६) आणि तनुश कोटियान (नाबाद ९) यांनी मुंबईला तीन चेंडू आणि तीन विकेट्स राखून विजय मिळवून दिला.