Join us  

१८ चेंडूंत ९० धावा! भारतीय फलंदाजाचे शतक, संघाने ट्वेंटी-२०त कुटल्या २७५ धावा, RCB चा रेकॉर्ड मोडला

Syed Mushtaq Ali Trophy 2023 - पंजाबचा सलामीवीर अभिषेक शर्माने रांचीच्या मैदानावर वादळी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 2:10 PM

Open in App

Syed Mushtaq Ali Trophy 2023 - पंजाबचा सलामीवीर अभिषेक शर्माने रांचीच्या मैदानावर वादळी खेळी केली. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतील क गटातील सामन्यात त्याने पंजाबसाठी आंध्र प्रदेशविरुद्ध झंझावाती शतक झळकावले. त्याने ५१ चेंडूत ११२ धावा केल्या आणि या वादळी खेळीत त्याने ९ चौकार व ९ षटकार खेचले. अभिषेकने अवघ्या ४२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि या दरम्यान त्याने ८ चौकार व ९ षटकार ठोकले. या सामन्यात अभिषेकसह अनमोलप्रीतनेही भरपूर धावा केल्या. त्याने २६ चेंडूत ८७ धावा केल्या. दोघांच्या झंझावाती खेळीमुळे पंजाबने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून २७५ धावा केल्या. यासह पंजाबने भारताच्या डोमॅस्टिक ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम धावांचा विक्रमही आज तुटला. १० वर्षांपूर्वी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ख्रिस गेलच्या झंझावाताच्या जोरावर पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध २६३ धावांचा डोंगर उभा केला होता. 

पंजाबचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. अभिषेकने पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याला दुसऱ्या टोकाला प्रभसिमरन सिंगची चांगली साथ मिळाली. दोघांमध्ये ९३ धावांची भागीदारी झाली. प्रभसिमरन बाद झाल्यानंतर पंजाबचा डाव थोडा गडगडला आणि १४६ धावांवर दुसरी विकेट पडली. अभिषेकला अनमोलप्रीतची साथ लाभली आणि दोघांनी मिळून १६ षटकांत डाव २०८ धावांपर्यंत नेला. 

अभिषेक बाद झाल्यानंतर अनमोलप्रीतने जबाबदारी स्वीकारली. सनवीर सिंगने ६ चेंडूंत नाबाद १५ धावा करून पंजाबला २७५ धावांपर्यंत पोहोचवले. अभिषेकने जुलैमध्ये इमर्जिंग आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान अ संघाविरुद्ध झंझावाती अर्धशतक झळकावले होते. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटपंजाबरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर