Join us

Ajinkya Rahane ची कडक फिफ्टी; पण शेवटी Sanju Samson च्या संघानं मारली बाजी

अजिंक्यची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. मुंबई संघान या स्पर्धेत पहिला सामना गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 16:51 IST

Open in App

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत टी-२० स्पर्धेत अनेक स्टार क्रिकेटर्सचा जलवा पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणेनं या स्पर्धेत अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले. पण शेवटी संजू सॅमसनच्या संगानं बाजी मारली.  सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील इ गटातील मुंबई आणि केरळा यांच्यातील सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना संजूच्या नेतृत्वाखालील केरळा संघानं निर्धारित २० षटकात ५ बाद २३४ धावा काढल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई संघाला निर्धारित २० षटकात १९१ धावांपर्यंत मजल मारता आली. अंजिक्यची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. मुंबईनं या स्पर्धेत पहिला सामना गमावला आहे.

संजू सॅमसन स्वस्तात आटोपला, पण रोहन अन् सलमाननं केली धमाकेदार खेळी

पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या केरळा संघाची सुरुवात एकदम खराब झाली होती. एक चौकार मारून संजू सॅमसन तंबूत परतला. शार्दुल ठाकूरनं त्याला बोल्ड केले. रोहन कुन्नुम्मल याने ४८ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने ८७ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्याशिवाय सलमान निझार याने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद ९९ धावांच्या खेळीच्या जोरावर केरळा संघानं ५ बाद २३४ धाावा केल्या. 

पृथ्वी-रघुवंशीचा फ्लॉप शो

या धावसंख्येचा पाठलाग करताना  पृथ्वी शॉ आणि रघुवंशी यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. पृथ्वी १३ चेंडूत २३ धावा तर रघुवंशी १५ चेंडूत१६ धावा करून तंबूत परतले.  २०० पार धावसंख्येचा पाठलाग करताना सलामी जोडी स्वस्तात माघारी फिरल्यामुळे संघ अडचणीत असताना मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी सेट होतीये असे वाटत असताना अय्यर बाद झाला. त्याने १८ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. 

अजिंक्य रहाणे  एकटा पडला

तो माघारी फिरल्यावर अजिंक्य रहाणेनं एकट्यानं किल्ला लढवला. ३५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने त्याने ६८ धावांची खेळी केली. पण दुसऱ्या बाजूला त्याला साथ मिळाली नाही. हार्दिक तामोरेच्या १३ चेंडूतील २३ धावा वगळता तळातील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी ममुंबईच्या संघाला ४३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. 

टॅग्स :अजिंक्य रहाणेटी-20 क्रिकेटमुंबईकेरळसंजू सॅमसन