सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत टी-२० क्रिकेट स्पर्धेत हार्दिक पांड्याचा जलवा पाहायला मिळतोय. तमिळनाडू विरुद्धच्या सामन्यातील धमाकेदार खेळीत एका षटकात २९ धावा कुटणाऱ्या पांड्यानं सलग दुसऱ्या सामन्यात पुन्हा एका गोलंदाजाची धुलाई केलीये. यावेळी त्याने त्रिपुराच्या ताफ्यातील गोलंदाजाचा समाचार घेतलाय. एका षटकात त्याने चौकार षटकारांची आतषबाजी करत २८ कुटल्याचे पाहायला मिळाले.
एका ओव्हरमध्ये कुटल्या २८ धावा
हार्दिक पांड्या बडोदा संघाकडून या स्पर्धेत एक से बढकर एक इनिंग खेळताना दिसतोय. त्रिपुरा विरुद्धच्या सामन्यात बडोदा संगासमोर फक्त ११० धावांच आव्हान मिळाले होते. या सामन्यात हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. पुन्हा एकदा त्याने आपल्या भात्यातील तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. २३ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने त्याने ४७ धावांची धमाकेदार इनिंग खेळली. यातील एका षटकात त्याने २८ धावा कुटल्या. परवेझ सुल्तानच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर त्याने षटकार मारला. त्यानंतर एक चेंडू निर्धाव टाकण्यात गोलंदाज यशस्वी ठरला. पण त्यानंतर हार्दिक पांड्याच्या भात्यातून सलग दोन षटकार एक चौकार आणि पुन्हा एक षटकार आला.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत प्रत्येक सामन्यात धमाकेदार शो
हार्दिक पांड्या देशांतर्गत टी-२० स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात धमाकेदार खेळी करताना पाहायला मिळत आहे. गुजरात विरुद्धच्यासामन्यात त्याने ३५ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली होती. उत्तराखंड विरुद्ध खेळताना त्याच्या भात्यातून २१ चेंडूत ४१ धावा आल्याचे पाहायला मिळाले. तमिळनाडू विरुद्धच्या सामन्यात त्याने ३० चेंडूत ६९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. आता पुन्हा एकदा त्याच्या बात्यातून २३ चेंडूत ४७ धावांची स्फोटक खेळी आल्याचे पाहायला मिळाले.