Syed Mushtaq Ali Trophy 2024 Suryakumar Yadav : भारतीय टी-२० संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील टी-२० सामन्यात धमाकेदार एन्ट्री मारली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईकडून खेळताना सूर्यानं ४६ चेंडूत ७० धावांची धमाकेदार खेळी केलीये. मुंबई आणि सर्विसेस यांच्यातील टी-२० सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात रंगला आहे.
पृथ्वीचा पुन्हा फ्लॉप शो! कॅप्टन श्रेयस अय्यरसह अजिंक्य स्वस्तात माघारी
सर्व्हिसेसच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ पुन्हा एकदा तीन चेंडूचा सामना करून शून्यावर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यर १४ चेंडूत २० धावा करून परतला. अजिंक्य रहाणेही १८ चेंडू खेळून २२ धावांवर बाद झाला. मुंबईच्या संघाने ६० धावांवर आघाडीच्या ३ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर सूर्याचा क्लास शो पाहायला मिळाला.
सूर्या अन् शिबम दुबेचा जलवा, दोघांनी केली १३० धावांची दमदार भागिदारी
या सामन्यात सूर्याच्या भात्यातून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याच्यासोबतच शिवम दुबेईची देखील मुंबईच्या संघात एन्ट्री झाली आहे. सर्विसेस विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून ३७ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी पाहायला मिळाले. आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सकडून खेळतो. दुसरीकडे शिवम दुबे हा चेन्नईच्या ताफ्यात आहे. पण सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत MI आणि CSK च्या भिडूंनी एकत्रित मिळून मुंबई संघासाठी १३० धावांची दमदार भागीदारी रचताना प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं.
शिवम दुबे शेवटपर्यंत थांबला
सूर्यानं ७ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने त्याने ४६ चेंडूत ७० धावांची दमदार खेळी केली. त्याला दुसऱ्या बाजूनं शिवम दुबेनं उत्तम साथ दिली. दौघांनी चौथ्या विकेटसाठी १३० धावा केल्या. शिवम दुबे ३६ चेंडूत २ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ७१ धावांवर नबाद राहिला. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघानं निर्धारित २० षटकात ४ बाद १९२ धावा केल्या.