Syed Mushtaq Ali Trophy 2024 : युवा सलामीवीर पृथ्वीचा सुपर सुपर शो; अजिंक्य रहाणेनं पुन्हा एकदा दाखवलेला क्लास अन् अखेरच्या षटकात शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे (Suryansh Shedge) यांनी केलेली तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबईच्या संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सेमीत आता पांड्या बंधूंचा बडोदा संघ मुंबईच्या हार्दिक स्वागतासाठी थांबला आहे. अर्थात १३ डिसेंबरला पहिल्या उपांत्य सामन्यात बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हे दोन संघ एकमेकांविरुद्ध भिडतील.
धावांचा पाठलाग करताना ओपनिंग जोडीचा क्लास शो; श्रेयस अय्यरसह सूर्याच्या पदरी मात्र निराशा
विदर्भ संघानं ठेवलेल्या २२२ धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ ४९(२६) आणि अंजिक्य रहाणे ८४ (४५) या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ४२ चेंडूत ८३ धावांची जबरदस्त भागीदारी रचली. पृथ्वी तंबूत परतल्यावर अजिंक्यनं आपला तोरा कायम ठेवला. दुसऱ्या बाजूला कॅप्टन श्रेयस अय्यर ५(५) आणि सूर्यकुममार यादव ९ (७) हे स्टार खेळाडू स्वस्तात तंबूत परतले. अजिंक्य रहाणेनं शिबम दुबेच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. रहाणे शतकी खेळी करेल, असे वाटत असताना तो बाद झाला. पण तंबूत परतण्याआधी त्याने सामना सेट करून ठेवला होता.
अखेरच्या ४ षटकात हव्या होत्या ६० धावा, शिबम-सूर्यांश जोडीनं ४ चेंडू राखून जिंकला सामना
शिवम दुबे हा मोठ्या फटकेबाजीसाठी माहीर आहे. त्याने ते दाखवूनही दिले. पण त्याला जॉईन झालेल्या सूर्यांशनं मी काही कमी नाही ते दाखवून दिले. शिवम दुबेनं २२ चेंडूत केलेल्या ३७ धावांच्या खेळीत १ चौकार आणि २ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूला सूर्यांश शेडगेनं १ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने १२ चेंडूत ३०० च्या स्ट्राइक रेटनं ३६ धावा कुटतं विदर्भ संघाच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. २४ चेंडूत ६० धावा हे आव्हनात्मक वाटणारे लक्ष या जोडीनं ४ चेंडू राखून पार केले.
तगडी फाईट
मुंबई आणि बडोदा यांच्यातील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणारा पहिला उपांत्य सामना हा भारतीय वेळेनुसार १३ डिसेंबरला सकाळी ११ वाजता सुरु होईल. यातील विजेता संघ १५ डिसेंबरला याच मैदानात अंतिम सामन्यात खेळताना दिसेल. दोन्ही संघ तगडे असून हा सामना एकदम जबरदस्त होईल, यात शंका नाही.
Web Title: Syed Mushtaq Ali Trophy 2024 Shivam Dube And Suryansh Shedge Pulled Off A Terrific Win Mumbai Into Semis Play Against Hardik Pandya Baroda
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.