महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो दबदबा राखला, तशीच अपेक्षा त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याच्याकडून करणे चुकीचे आहे. तरीही अर्जुनच्या मैदानावरील कामगिरीवर साऱ्यांचे बारीक लक्ष असते. सय्यद मुश्ताक आली ट्रॉफीसाठी मुंबई संघनिवडीसाठीच्या सराव सामन्यांत अर्जुनला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. टीम डी चे प्रतिनिधित्व करताना अर्जुनला चार सामन्यांत चार विकेट्स घेता आल्या. फलंदाजीतही त्यानं निराश केलं आणि तीन डावांमध्ये ७ धावा केल्या. अशा परिस्थितीत त्याची मुश्ताक अली ट्रॉफीसाठीच्या मुंबई संघात निवड होणे अवघड आहे.
२१ वर्षीय अर्जुननं पहिल्या सामन्यात टीम सी विरुद्ध ४ षटकांत २३ धावांत दोन विकेट्स घेतल्या. पुढच्याच सामन्यात ( टीम बी) त्यानं ३३ धावा देताना १ विकेट घेतली. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं अर्जुनच्या एकाच षटकात २१ धावा चोपल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात त्यानं ९च्या सरासरीनं ३७ धावा दिल्या. चौथ्या सामन्यात त्याला एकही विकेट घेतला आली नाही. येत्या काही दिवसांत मुंबई क्रिकेट असोसिएशन संघ जाहीर करेल आणि सर्वांच्या नजरा अर्जुनचं नाव शोधण्यात व्यग्र होतील. त्याची निवड झाल्यास, तो प्रथमच मुंबईच्या वरिष्ठ संघात खेळेल.
भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी खेळाडू अर्जुनकडे टीम इंडियाच्या नेटमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. तो मुंबई इंडियन्ससोबत यूएईलाही गेला होता. सराव सामन्यांत तुषार देशपांडेनं सर्वाधिक ९ विकेट्स घेतल्या. आकाश पारकनं पाच विकेट्स घेतल्या. फलंदाजीत सूर्यकुमार यादवनं शतकासह २४० धावा चोपल्या. यशस्वी जैस्वालनेही १६४ आणि शिवम दुबेनं ११४ धावा केल्या. सूर्यकुमार, दुबे, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड आणि आदित्य तरे यांची निवड पक्की मानली जात आहे. १० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे.