Syed Mushtaq Ali Trophy 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका.... अशा स्पर्धांतून नजरंदाज केल्या केलेल्या पृथ्वी शॉ याने ( Prithvi Shaw) आज निवड समितीला जबदरस्त चपराक दिली. दुखापतीतून सावरल्यानंतर पृथ्वीने रणजी करंडक, सय्यद मुश्ताक अली, विजय हजारे आदी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. मात्र, ना त्याचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी विचार झाला, ना नुकत्याच पार पडलेल्या आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी. त्यानंतर पृथ्वीने सोशल मीडियावर अप्रत्यक्षितपणे आपली नाराजी व्यक्त केली, परंतु आज त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२२ स्पर्धेत आसामविरुद्ध चौकार-षटकारांची आतषबाजी करताना ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले.
भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना पृथ्वीने न्यूझीलंड अ विरुद्धच्या वन डे मालिकेतही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला आफ्रिकेविरुद्ध संधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. त्यानंतर मुश्ताक अली ट्रॉफीत तो सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. मिझोरामविरुद्ध नाबाद ५५ धावा कुटणाऱ्या पृथ्वीने मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्याच षटकात ०, ४,४,४,४,४ असा धुरळा उडवला. आज आसामविरुद्ध त्याने पाचव्या षटकात ४,४,४,६,६,४ अशी धुलाई केली. अमन खान १५ धावा करून माघारी परतल्यानंतर पृथ्वी व यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली.
यशस्वी ३० चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ४२ धावांत बाद झाल्यानंतरही पृथ्वीची फटकेबाजी सुरूच राहिली. १८व्या षटकात हे वादळ रोखण्यात आसामला यश आले. पृथ्वी ६१ चेंडूंत १३४ धावा करून माघारी परतला. त्याने १३ चौकार व ९ षटकार खेचून अवघ्या २२ चेंडूंत १०६ धावांचा पाऊस पाडला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. २०१९मध्ये श्रेयस अय्यरने सिक्कीमविरुद्ध १४७ धावा केल्या होत्या. पृथ्वीने २०१५ साली शोएब शेखने गुजरातविरुद्ध नोंदवलेला ११० धावांचा विक्रम मोडला. श्रेयस अय्यर १०३* ( वि. मध्य प्रदेश, २०१९) आणि रोहित शर्मा १०१* ( वि. गुजरात, २००७) हे या विक्रमात टॉप फाईव्हमध्ये आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Syed Mushtaq Ali Trophy: Maiden hundred for Captain Prithvi Shaw in T20 format, 134 runs from just 61 balls including 13 fours and 9 sixes
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.