डोपिंग नियमांच्या उल्लंघनानंतर पुन्हा क्रिकेटमध्ये सक्रीय झालेल्या पृथ्वी शॉ यानं बुधवारी आणखी एक वादळी खेळी केली. आठ महिन्यांच्या बंदीनंतर मैदानावर परतलेल्या पृथ्वीनं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत पाच सामन्यांतील तिसरे अर्धशतक झळकावलं. त्याच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईनं उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी दमदार खेळी केली आहे. पृथ्वीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतक झळकावत मुंबईला 20 षटकांत दोनशेपार धावा करून दिल्या.
बुधवारी झालेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात पृथ्वीची बॅट पुन्हा तळपली. त्यानं पहिल्या विकेटसाठी आदित्य तरेसोबत 71 धावांची भागीदारी केली. दोघांनी 6.5 षटकांत मुंबईला हा पल्ला गाठून दिला. हरप्रीत ब्रारनं आदित्यला माघारी पाठवून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतरही पृथ्वीची फटकेबाजी सुरूच होती. त्यानं 24 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 50 धावा पूर्ण केल्या. त्याला हरप्रीतनं बाद केले. पृथ्वी 27 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारांसह 53 धावा कुटल्या.
पृथ्वी माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही वैयक्तिक अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. सूर्यकुमार 35 चेंडूंत 8 चौकार व 5 षटकार खेचून 80 धावांवर माघारी परतला. सिद्धार्थ कौलनं त्याला माघारी पाठवलं. श्रेयस 40 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकार खेचून 80 धावांवर नाबाद राहिला. मुंबईनं 20 षटकांत 3 बाद 243 धावांचा डोंगर उभा केला.