सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत टी स्पर्धेत अनेक भारतीय स्टार खेळाडूंचा जलवा पाहायला मिळत आहे. या यादीत आता मुंबई संघाच्या ताफ्यातून खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरचाही समावेश झाला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरारष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सर्विसेज विरुद्धच्या सामन्यात त्याने दमदार कमबॅक करुन दाखवलं. मुंबईकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेत त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
शार्दुलचा भेदक मारा
मुंबईच्या संघाने हैदराबादच्या मैदानात रंगलेल्या सर्विसेज विरुद्धच्या लढतीत पहिल्यांदा बॅटिंग केली. सूर्यकुमार यादव ७०(४६) आणि शिवम दुबे ७१ (३६)* यांच्या वादळी अर्धशकी खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघानं निर्धारित २० षटकात ४ बाद १९२ धावा करत सर्विसेजसमोर १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीसमोर आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले.
चौघांपैकी दोघांच्या पदरी भोपळा; एकालाही होऊ दिलं नाही सेट
नितीश तन्वरच्या रुपात शार्दुल ठाकुरनं मुंबई संघाला पहिलं यश मिळवून दिले. या फलंदाजाला खातेही उघडता आले नाही. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या विनीतची अवस्थाही शार्दुलनं तशीच केली. तोही ४ चेंडूचा सामना करून शार्दुलच्या गोलंदाजीवर बाद झाला. सलामीवीर कन्वर पाठक १४(७) आणि गौरव कोचर ६(६) यांची विकेट घेत शार्दुल ठाकूरनं सर्विसेजची अवस्थान ४ बाद ३४ अशी केली. शार्दुल ठाकूर आधी झाली होती बेक्कार धुलाई
याआधी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत शार्दुल ठाकूरनं ४ षटकांच्या कोट्यात ६९ धावा खर्च केल्याचे पाहायला मिळाले होते. पण त्यानंतर त्याने दमदार कमबॅक करून दाखवलं. मागील दोन सामन्यात ८ षटके गोलंदाजी करताना ३७ धावा खर्च करून मुंबईकर वाघानं ७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
मुंबईनं नोंदवला स्पर्धेतील चौथा विजय
शार्दुल ठाकूरनं सुरुवातीला दिलेल्या धक्क्यामुळे मुंबईसाठी सामना सहज सोपा झाला. सर्विसेजकडून कॅप्टन मोहित अहलावत याने ४० चेंडूत ५४ धावा करत एकाकी झुंज दिली. पण संघाला फक्त १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईच्या संघाने ३९ सामन्यासह सामना जिंकत स्पर्धेतील चौथ्या विजयाची नोंद केली.