बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात हॅटट्रिक घेऊन विश्वविक्रमाला गवसणी घालणाऱ्या टीम इंडियाच्या दीपक चहरनं बुधवारी आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 त्यानं 7 धावांत 6 फलंदाज माघारी पाठवले होते आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही जगातील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. त्यानंतर चहरनं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेतही आपल्या गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींना स्तब्ध केलं. पण, बुधवारी त्यानं गोलंदाजीत नव्हे, तर फलंदाजीत विक्रमाला गवसणी घातली. राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपकनं षटकारांची आतषबाजी केली आणि संजू सॅमसन व नितीश राणा या ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट फलंदाजांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 चषक स्पर्धेच्या सुपर लीगच्या A गटात आज राजस्थान आणि दिल्ली यांच्यात करो वा मरो असा सामना सुरू आहे. स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी दोन्ही संघांना विजय मिळवणे अनिवार्य आहे. त्यामुळे सामन्यात जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थाननं 7 बाद 133 धावा केल्या. राजस्थानच्या महेंद्र नरेंद्र सिंग ( 0) आणि अंकित लांबा ( 5) यांना अपयश आले. त्यानंतर राजेश बिश्नोईनं 36 धावांची खेळी केली, परंतु दुसऱ्या बाजूनं एकही फलंदाज खेळपट्टीवर टीकत नव्हता.
सलमान खान ( 23) आणि दीपक चहर यांनी राजस्थानला समाधानकारक पल्ला गाठून दिला. यात दीपकचा फार महत्त्वाचा वाटा आहे. त्यानं 42 चेंडूंत 7 षटकारांची आतषबाजी करताना नाबाद 55 धावांची खेळी केली. त्याच्या याच फटकेबाजीच्या जोरावर राजस्थाननं 133 धावा केल्या. या खेळीसह दीपकनं एक विक्रम नावावर केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकही चौकार न मारता सर्वाधिक 7 षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्यानं एन्ट्री घेतली आहे. अशी कामगिरी केवळ तीनच भारतीयांना करता आली आहे. यात नितीश राणानं 2017च्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 34 चेंडूंत नाबाद 62 धावा, तर 2017मध्ये संजू सॅमसननं गुजरात लायन्सविरुद्ध 31 चेंडूंत 61 धावा केल्या होत्या. या दोघांनीही आपल्या खेळीत एकही चौकार न मारता 7 षटकार खेचले होते.