Syed Mushtaq Ali Trophy - ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. भारत-अफगाणिस्तान हा फायनल सामना पावसामुळे रद्द झाला आणि आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ वरचढ असल्याने त्यांना विजेता घोषित करण्यात आले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर ऋतुराज आता सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळतोय आणि त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आज बंगालविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली.
बंगालने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५६ धावा केल्या. कर्णधार सुदीप घरमीने ४४ आणि रंजोत खारियाने नाबाद ४९ धावांची खेळी केली. महाराष्ट्राच्या आर्षिन कुलकर्णीने दोन विकेट्स घेतल्या. पीसी दाढे, विकी ओत्स्वाल, एएन काझी आणि पीएच सोळंकी यांनी प्रत्येकी १ बळी टिपला. लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाडने दमदार फटकेबाजी केली. कुलकर्णी १३ धावांवर बाद झाला. कर्णधार केदार जाधवने दुसऱ्या विकेटसाठी ऋतुराजला साथ दिली. ऋतुराजने ४० चेंडूंत ९ चौकार व ५ षटकार खेचून ८२ धावा केल्या. ऋतुराजच्या फटकेबाजीने महाराष्ट्राने १०.३ षटकांत २ बाद ११९ धावा केल्या आणि विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला.
गुजरातच्या सौरव चौहानने १३ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि ही सय्यद अली मुश्ताक ट्वेंटी-२० स्पर्धेतील वेगवान अर्धशतक ठरले. २३ वर्षीय सौरवने २०१९मध्ये मेघालयाच्या अभय नेगीचा १४ चेंडूंतील फिफ्टीचा विक्रम मोडला. सौरवने १८ चेंडूंत ६१ धावा कुटल्या आणि त्यात ५ चौकार व ६ षटकार खेचले. त्याच्या फटकेबाजीमुळे अरुणाचल प्रदेशने ठेवलेले १२७ धावांचे लक्ष्य सहज पार झाले.