IND vs SA Live Scorecard : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ब्रिजटाऊन येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेची फायनल होणार आहे. भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमधील ११ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे, तर आफ्रिकेला प्रथमच आयसीसी स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत Ind vs SA अशी लढत सातव्यांदा होत आहे आणि यापैकी पाच लढती या २००७ ते २०१२ या कालावधीत झाल्या होत्या. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याची ही टीम इंडियासोबत शेवटची स्पर्धा आहे आणि रोहित अँड कंपनी त्याला विजयी निरोप देण्यासाठी सज्ज आहे. रोहित व विराट कोहली या सीनियर खेळाडूंचा कदाचित हा शेवटचा वर्ल्ड कप असल्याने, त्यांनाही जेतेपदाचा चषक खुणावतोय. वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासूनच टीम इंडिया जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये आघाडीवर होतीच. अफगाणिस्तानने अचंबित करणारी कामगिरी करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पाकिस्तानचे आव्हान पहिल्याच फेरीत संपले, तर ऑस्ट्रेलियासारखा तगडा संघ सुपर ८ मध्येच बाहेर पडला. गतविजेत्या इंग्लंडला नमवून भारत फायनलमध्ये पोहोचला.
भारताने २०१३ नंतर आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही आणि ११ वर्षांचा दुष्काळ आज संपेल अशी आशा सर्वांना आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका प्रथमच वर्ल्ड कप फायनल खेळतेय आणि त्यांना यश मिळाले, पाहिजे असाही एक प्रवाह आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याच्या मनाची अवस्थाही अशीच झाली आहे.
तो म्हणाला, मला मनापासून वाटतं की दक्षिण आफ्रिकेनं वर्ल्ड कप जिंकायला हवं. बऱ्याच वर्षानंतर ते फायनल खेळत आहेत. त्यांच्याकडे मोठे खेळाडू होते, परंतु त्यांना इथपर्यंत कधी पोहोचता आले नाही. त्यामुळे संपूर्ण जगाला वाटतं की त्यांनी जिंकावे. पण, त्यांच्यासमोर भारतीय संघ आहे. २००७ नंतर भारत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकलेला नाही, त्यांनाही वर्ल्ड कप उंचावून बराच काळ झाला आहे आणि हा वर्ल्ड कप ते जिंकतील.