शारजा : सध्या क्रिकेटविश्वात टी२० क्रिकेटची धूम सुरू असताना, शारजामध्ये टी१० क्रिकेटचा धमाका सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या दिग्गज खेळाडूंचा या लीगमध्ये समावेश असल्याने, क्रिकेटप्रेमींना थरारक खेळाचा आनंद मिळत आहे. या स्पर्धेसाठी ‘लोकमत’ प्रिंट पार्टनर आहे.ऐतिहासिक शारजा क्रिकेट स्टेडियममध्ये गुरुवारी या लीगचा रंगतदार उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर, पहिला सामना केरला किंग्स विरुद्ध बेंगाल टायगर्स या संघात झाला. या सामन्यात केरला संघाने एकहाती वर्चस्व राखताना, ८ विकेट्सने बेंगाल संघाचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळविला. त्याच वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ते पख्तून्स विरुद्ध मराठा अरेबियन्स या सामन्याने. पख्तून्स संघाकडून पाकिस्तानचा दिग्गज शाहिद आफ्रिदी, तर मराठा संघाकडून ‘मुलतानचा सुलतान’ वीरेंद्र सेहवाग खेळत होते. या सामन्यात आफ्रिदीच्या जादुई फिरकीच्या जोरावर पख्तून्सने २५ धावांनी बाजी मारत, मराठा संघाचे तगडे आव्हान परतावले. विशेष म्हणजे, आफ्रिदीने हॅटट्रिक घेताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करताना पख्तून्स संघाने निर्धारित १० षटकांत ४ बाद १२१ धावांचा डोंगर उभारला. फखर जमा याने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. त्याने २२ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकांत खेचले, तसेच लियाम डॉसन याने २३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी करत ४४ धावांचा तडाखा दिला. मराठा संघाकडून इमाद वासिम याने दोन बळी घेत, आपली छाप पाडली. या आव्हानाचा पाठलाग करताना, मराठा संघाला १० षटकांत ७ बाद ९६ धावा अशी मर्यादित मजल मारता आली. त्यांची सर्व मदार धडाकेबाज सेहवागवर होती, पण मधल्या फळीत फलंदाजीला उतरलेला सेहवाग पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने, मराठा संघ बॅकफूटवर आला, तरी अॅलेक्स हेल्सच्या नाबाद ५७ धावांच्या खेळीच्या जोरावर मराठा संघाच्या आशा कायम होत्या, परंतु इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळल्याने हेल्सचे प्रयत्न अपयशी ठरले. एक वेळ मराठा संघ २ बाद ४६ धावा असा सुस्थितीत होता. मात्र, आफ्रिदीने पाचव्या षटकात रोसाऊ, ड्वेन ब्रावो आणि सेहवाग यांना बाद करत, सामन्याचा निकाल स्पष्ट केला. आफ्रिदीने २ षटकांत केवळ ७ धावा देताना ३ महत्त्वपूर्ण बळी घेत, निर्णायक कामगिरी केली, तसेच मोहम्मद इरफान आणि सोहेल खान यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- टी१० क्रिकेटचा धडाका सुरू, दिग्गज खेळाडूंचा सहभाग, आफ्रिदीने घेतली हॅट्ट्रिक
टी१० क्रिकेटचा धडाका सुरू, दिग्गज खेळाडूंचा सहभाग, आफ्रिदीने घेतली हॅट्ट्रिक
सध्या क्रिकेटविश्वात टी२० क्रिकेटची धूम सुरू असताना, शारजामध्ये टी१० क्रिकेटचा धमाका सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या दिग्गज खेळाडूंचा या लीगमध्ये समावेश असल्याने, क्रिकेटप्रेमींना थरारक खेळाचा आनंद मिळत आहे. या स्पर्धेसाठी ‘लोकमत’ प्रिंट पार्टनर आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:38 PM