दुबई : कर्णधार इआॅन मॉर्गन याने केलेल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर केरळा किंग्जने शानदार विजयासह पंजाबी लिजंड्सचा धुव्वा उडवत पहिल्या टी-१० लीग क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मॉर्गनने अवघ्या १४ चेंडूंत अर्धशतक झळकावत २१ चेंडूत ५ चौकार व ६ षटकारांसह ६३ धावांचा तडाखा देत केरळाच्या जेतेपदामध्ये निर्णायक भूमिका बजावली. या स्पर्धेसाठी ‘लोकमत’ प्रिंट पार्टनर होते.
शारजा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबी संघाने निर्धारित १० षटकांत ३ बाद १२० धावांची आव्हानात्मक मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना केरळा संघाने मॉर्गनच्या धडाक्यामुळे केवळ ८ षटकांत २ बाद १२१ धावा काढून दिमाखात बाजी मारली. धावांचा पाठलाग करताना केरळाला पहिल्याच चेंडूवर चॅडविक वॉल्टनच्या रूपाने झटका बसला. तो भोपळाही न फोडता परतला. मात्र यानंतर पॉल स्टिर्लिंग आणि मॉर्गन यांनी सर्व सूत्रे आपल्याकडे घेत पंजाबी गोलंदाजांची धुलाई केली. स्टिर्लिंगने अखेरपर्यंत नाबाद राहताना २३ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करताना ५२ धावांचा तडाखा दिला. दुसरीकडे मॉर्गनने तुफानी हल्ला करताना केवळ १४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत पंजाबी संघाची हवा काढली. विजयापासून ८ धावा दूर असताना मॉर्गन हसन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. परंतु, तो पर्यंत केरळाचा विजय निश्चित झाला होता.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाºया पंजाबी संघाने सलामीवीर ल्यूक राँचीच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर आव्हानात्मक मजल मारली. राँचीने ३४ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांसह ७० धावांचा चोप दिला. त्याच वेळी, उमर अकमल (६), क्रेग ब्रेथवेट (३*) आणि फाहीम आश्रफ (९*) यांना फारशी चमक दाखवता आली नाही. परंतु, मधल्या फळीतील शोएब मलिकने १४ चेंडूत १ चौकार व
२ षटकारांसह २६ धावा कुटल्याने पंजाबी संघाला शतकी टप्पा पार करण्यात यश आले.
अन्य उपांत्य सामन्यात पख्तून्स संघाने दिलेले १३० धावांचे तगडे आव्हान पंजाबी संघाने केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात ५ चेंडू राखून पार केले. अहमद शेहझाद (५८), कर्णधार शाहिद आफ्रिदी (४१) यांनी पख्तून्सला मजबूत केले. परंतु, पंजाबीच्या ल्यूक राँची (६०*), शोएब मलिक (४८*) यांनी पख्तून्सला स्पर्धेबाहेर केले.
याआधी उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात केरळा किंग्जने मराठा अरेबियन्स संघाचे आव्हान ५ विकेट्सने पार करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. प्रथम फलंदाजी करणाºया मराठा संघाला ९ बाद ९७ धावांवर रोखल्यानंतर केरळा संघाने आवश्यक धावा ५ चेंडू राखून पूर्ण केल्या.
सोहेल तन्वीर (३), रायद एम्रीट (२) आणि लियमा प्लंकेट (२) यांनी मराठा संघाला मर्यादेत रोखले. मराठाकडून ड्वेन ब्रावो (२७) आणि कर्णधार इमाद वासिम (१८) यांनी झुंज दिली. यानंतर कर्णधार इआॅन मॉर्गनने ३२ चेंडूत ५३ धावा चोपताना संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
Web Title: T-10 Cricket League: Kerala became 'King', Morgan hit half-century in 14 balls; Punjabi Legends Overwhelmed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.