दुबई : गेल्या वर्षी आम्ही अंतिम फेरीत धडक मारल्यानंतरही थोडक्यात जेतेपद निसटले. यंदा मात्र आम्ही कोणतीही कसर सोडणार नसून गेल्या वेळच्या चुका सुधारुन जेतेपदावर नाव कोरणारंच,’ असा निर्धार टी१० लीग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सत्रातील उपविजेते पखतून्स संघाचे सीईओ तजुद्दिन खान यांनी व्यक्त केला. तजुद्दिन म्हणाले की, ‘गेल्या सत्रात अंतिम फेरी गाठल्यानंतर दुर्दैवाने आम्ही जेतेपद पटकावू शकलो नाही. यंदा मात्र आम्ही कोणतीही संधी सोडणार नसून आमची तयारीही ठरविलेल्या योजनेप्रमाणे झाली आहे.’ गेल्या वर्षी पखतून्स संघाचे नेतृत्त्व स्टार अष्टपैलू शाहिद आफ्रिदीच्या खांद्यावर होते. याविषयी तजुद्दिन म्हणाले की, ‘यंदा संघाची धुरा कोणाकडे असेल याचा अद्याप निर्णय झालेला नाही. यासाठी आमच्या संघ व्यवस्थापनाची लवकरच बैठक होईल आणि कर्णधाराचा प्रश्नही सुटेल.’ आफ्रिदी संघाचा महत्त्वाचा खेळाडू असल्याचे सांगताना तजुद्दिन म्हणाले की, ‘मंगळवारी आम्ही सराव सामना खेळणार आहोत. यावेळी आफ्रिदीची उपस्थिती संघासाठी खूप मोलाची ठरणार आहे. क्रिकेटच्या या अतिवेगवान प्रकाराविषयी त्याच्याकडे असलेला अनुभव खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे. तो संघातील प्रत्येक सदस्यासाठी प्रेरणादायी आहे.’पखतून्स संघाने भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी. सिंग याला आपल्या संघात स्थान दिले आहे. याविषयी तजुद्दिन यांनी म्हटले की, ‘आरपी सिंगला संघात घेऊन आम्ही आनंदी असून त्याच्याकडे वेगवान गोलंदाजीचा मोठा अनुभव आहे. त्याच्यामुळे संघातील इतर वेगवान गोलंदाजांना फायदा होईल. त्याचप्रमाणे इंग्लंडचा अष्टपैलू डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली याची उपस्थितीही संघासाठी मोलाची ठरणार आहे.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- टी-१० क्रिकेट लीग : यंदा जेतेपदाची संधी सोडणार नाही
टी-१० क्रिकेट लीग : यंदा जेतेपदाची संधी सोडणार नाही
गतउपविजेत्या पखतून्स संघाचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 9:14 PM
ठळक मुद्देगेल्या वर्षी पखतून्स संघाचे नेतृत्त्व स्टार अष्टपैलू शाहिद आफ्रिदीच्या खांद्यावर होते.यंदा संघाची धुरा कोणाकडे असेल याचा अद्याप निर्णय झालेला नाही. पखतून्स संघाने भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी. सिंग याला आपल्या संघात स्थान दिले आहे.