लखनौ : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय महिला संघ शनिवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत छाप सोडण्यास उत्सुक आहे. या मालिकेत वर्चस्व गाजविण्यासाठी भारतीय संघाला खेळाच्या प्रत्येक विभागात सरस कामगिरी करावी लागेल. (T-20: Indian women eager for return, The match against south Africa will be played today)मिताली राजच्या नेतृत्वाखालील एकदिवसीय संघाने दुसऱ्या लढतीत ९ गड्यांनी मिळविलेल्या विजयाचा अपवाद वगळता भारताला या मालिकेत सांघिक कामगिरी करण्यात अपयश आले. दुसऱ्या बाजूचा विचार करता दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेत फॉर्मात दिसला. पाहुणा संघ टी-२० मालिकेतही हाच फॉर्म कायम राखण्यास प्रयत्नशील राहील. भारतीय संघाची गेल्या वर्षभरातील ही पहिली मालिका होती आणि त्यासाठी संघ तयार नसल्याचे निदर्शनास आले. भारताने तिसऱ्या व चौथ्या वन-डेमध्ये आव्हानात्मक मजल मारली, पण पहिल्या व पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये फलंदाज अपयशी ठरले. भारताला युवा शेफाली वर्माची उणीव भासली. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी करणारी ही १७ वर्षीय खेळाडू आता आघाडीच्या फळीत परतणार आहे.
हरमनप्रीत आऊटभारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत दुखापतीमुळे पहिल्या टी-२० सामन्यात खेळू शकणार नसल्याचे उपकर्णधार स्मृती मानधनाने शुक्रवारी स्पष्ट केले. हरमनप्रीतला बुधवारी पाचव्या एकदिवसीय सामन्यादरम्यान फलंदाजी करताना दुखापत झाली. टी-२० मालिकेतील पहिली लढत शनिवारी खेळली जाणार आहे.