नवी दिल्ली : मागील दोन महिने आयपीएल खेळण्यात व्यस्त असलेले भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ जूनपासून पाच टी -२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचे गुरुवारी नवी दिल्लीत आगमन झाले.
कर्णधार तेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वाखाली आफ्रिका संघ भारतात दाखल झाला. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने याबाबत ट्विट केले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ एक खास विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
भारतीय संघाने मागील सलग १२ टी -२० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हे सलग विजय मिळवत भारतीय संघाने अफगाणिस्तान आणि रोमानियाशी बरोबरी साधली होती. आता ९ जूनला होणारा १३ वा सामना जिंकून नवीन विक्रम करण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलॅन्ड, नामिबिया, न्यूझीलंड या संघांविरुद्ध प्रत्येकी एक तर वेस्ट इंडीज आणि श्रीलंका संघाविरुद्ध प्रत्येकी तीन विजयांची नोंद केली आहे.
भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघातील अनेक खेळाडू सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. डेव्हिड मिलरला तर आयपीएल खेळण्याचा चांगला अनुभव आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल हंगामात मिलरने ४८१ धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत आफ्रिका संघाला भारताला रोखायचे असेल, तर मिलर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. भारतीय संघाचा विचार केल्यास, मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये लोकेश राहुल भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.
याआधी २०१५ ला दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदा दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतात आला. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने २-० ने विजय मिळविला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा तीन सामन्यांची टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका २०१९ मध्ये भारतात आला. ही मालिका एक-एक अशी बरोबरीत सुटली होती.