अँटीग्वा - महिला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर सहजच विजय मिळवला. इंग्लंडने दिलेल्या 106 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाने 8 विकेट आणि 29 चेंडू राखत विश्वचषकावर नाव कोरले. अॅश्ले गार्डनर आणि मेग लॅनिंग यांनी ऑस्ट्रेलियाला चौथ्यांदा विश्वचॅम्पियन पदाचा बहुमान मिळवून दिला.
वेस्ट इंडिजमधील अँटीग्वा येथे महिला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ केवळ 105 धावांतच गुंडाळला. इंग्लंडने 19.4 षटकांचा खेळ करत 105 धावा केल्या. सुरुवातीपासून इंग्लंडची फलंदाजी ठेपाळल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शेवटच्या षटकापर्यंत खेळ करणे इंग्लंडच्या महिला फलंदाजांना शक्य झाले नाही. पहिल्या 11 षटकांतच इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता. डॅनियल वेटच्या 37 चेंडुतील 43 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे इंग्लंडला शतकाचा टप्पा पार करता आला. तर, कर्णधार हेथर नाईटनेही 25 धावा करत डॅनियलला मोलाची साथ दिली. त्यामुळे इंग्लंडने कांगारुंसमोर 105 धावांचे लक्ष्य ठेवले.
इंग्लंडच्या 105 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने सहजच विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्ले गार्डनर 33 आणि मेग लॅनिंग 28 यांनी 62 धावांची नाबाद भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे ब्रिटिशांनी दिलेल्या 105 धावांचे लक्ष्य कांगारूंनी केवळ 15.1 षटकात 8 विकेट राखून आरामात पार केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने महिला टी-20 स्पर्धेत चौथ्यांदा विश्वचॅम्पियनपद पटकावले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नकडून टीम ऑस्ट्रिलियाचे अभिनंदन