भारतीय संघ 2021च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. उपांत्य फेरी गाठणारा न्यूझीलंड हा चौथा संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड आधीच उपांत्य फेरीत पोहोचले होते. म्हणजेच, आता सोमवारी भारताचा नामिबियाविरुद्ध होणारा सामना, म्हणजे केवळ एक औपचारिकताच उरली आहे. पण विशेष बाब म्हणजे, विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा टी-20 फॉर्मेटमधील अखेरचा सामना, तसेच कर्णधार म्हणून 50 वा टी-20 सामना असेल.
T20 विश्वचषक 2021 सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने T-20 फॉरमॅटमधील भारतीय संघाचे कर्णधारपद सोडण्यासंदर्भात घोषणा केली होती. पण, तो एक खेळाडू म्हणून भारतीय संघाचा भाग राहील. आता टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध होणार आहे, अशातच, विराट कोहलीचा टी-20 फॉरमॅटमधील कर्णधार पदाचा प्रवास येथेच संपत आहे.
विराट कोहलीने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि टाइम शेड्यूल कंट्रोलमध्ये आणण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने केवळ भारतीय संघच नव्हे, तर इंडियन प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपदही सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या म्हणण्याप्रमाणे, तो संघ व्यवस्थापनाशी बऱ्याच दिवसांपासून यासंदर्भात चर्चा करत होता.
विराट कोहलीने T20 फॉरमॅटमध्ये एकूण 49 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. यांपैकी 29 सामने जिंकले आहेत, 16 सामन्यांत पराभव झाला आहे, दोन सामने टाय झाले आहेत, तर दोन सामन्यांचा निकाल लागलेला नाही. विजयाचा विचार करता, विराट कोहलीने ६३ टक्के सामने जिंकले आहेत. टी-२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामन्यांत कर्णधार म्हणून नेतृत्व करणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महेंद्रसिंग धोनीने 72 सामन्यांचे नेतृत्व केले आहे.
टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये भारताचा प्रवास -• पाकिस्तानने 10 विकेटने पराभूत केले.• न्यूझीलंडने 8 विकेट्सने पराभूत केले.• अफगानिस्तानविरुद्ध 66 धावांनी विजय.• स्कॉटलँडवर 8 विकेट्सनी विजय.