भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला ( Rajeev Shukla) यांनी टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही, हे स्पष्ट केले. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं अर्थात ICCनं आयोजित केली आहे आणि कोणताच संघ सामना खेळण्यास नकार देऊ शकत नाही. मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांकडून सुरू असलेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर भारतानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी जोर धरत आहे.
राजीव शुक्ला म्हणाले, दहशतवाद्यांविरोधात कठोरातील कठोर पाऊल उचलले जाईल. पण, आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. दहशतवादी संघटनांना धडा शिकवला जाईल. पण, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलाल तर आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडिया शेजारील राष्ट्राविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही. भारतच काय, तर कोणताच संघ कोणत्याही प्रतिस्पर्धीविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही.''