नवी दिल्ली-
भारतात क्रिकेटला धर्मच मानलं जातं. क्रिकेटची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की चाहत्यांना आपल्या आवडच्या क्रिकेटपटूबाबत खडानखडा माहिती असते. यातच क्रिकेटपटू देखील युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी पुढाकार घेऊन या क्षेत्रात योगदान देताना दिसतात. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज टी.नटराजन यानं देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. घातक गोलंदाजीसाठी ओळखला गेलेल्या टी.नटराजन यानं सामाजिक भान दाखवत युवा क्रिकेटपटूंसाठी आपल्या गावातच क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. टी. नटराजनच्या या निर्णयाचं सर्वस्तरातून कौतुक केलं जात आहे.
भारतीय संघाकडून खेळलेला युवा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन सध्या भारतीय संघापासून दूर आहे. पण याकाळात तो करत असलेल्या कामानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नटराजन आपल्या गावात एक क्रिकेट स्टेडियम तयार करत आहे. या स्टेडियमचं नाव नटराजन क्रिकेट ग्राऊंड असं ठेवण्यात येणार आहे.
टी. नटराजन याला जेव्हा जेव्हा भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे त्यानं संधीचं सोनं करुन दाखवलं आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात टी. नटराजन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केलं. यॉर्कर गोलंदाजी प्रमुख अस्त्र असलेल्या टी. नटराजनच्या उल्लेखनीय कामगिरीनं आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. ३० वर्षीय टी. नटराजन यानं आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर करत स्वत:च्या नावाचं क्रिकेट स्टेडियम उभारत असल्याची घोषणा केली आहे. "माझ्या गावात सर्व सुविधांनी सज्ज असलेले क्रिकेट ग्राऊंड उभारण्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारतीय संघात मी पदार्पण केलं आणि या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात गावात स्टेडियम तयार होतंय", असं ट्विट टी. नटराजन यानं केलं आहे.
टी. नटराजन यानं भारतीय संघाकडून आतापर्यंत १ कसोटी, २ एकदिवसीय आणि चार ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. यात एकूण मिळून १३ विकेट्स मिळवल्या आङेत. याच वर्षाच्या सुरुवातीला सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन यानंही टी. नटराजनच्या गोलंदाजीचं कौतुक केलं होतं.