T Natarajan super swing Video, IPL 2022 SRH vs RCB Live: सनराजर्स हैदराबादच्या भेदक माऱ्यापुढे शनिवारच्या सामन्यात RCBच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. बंगलोरचे महत्त्वाचे सात फलंदाज संघाच्या पन्नाशीच्या आधीच माघारी परतले. तळाच्या फलंदाजांनाही फारशी चमक दाखवणं जमलं नाही. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा डाव ६८ धावांवर आटोपला. त्यांच्या डावात टी नटराजनने हर्षल पटेलचा बोल्ड काढला, त्याची चांगलीच चर्चा रंगली.
फाफ डू प्लेसिस (५) आणि अनुज रावत (०) हे दोनही सलामीवीर दुसऱ्या षटकात बाद झाले. विराट कोहलीही त्याच षटकात पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. भरवशाचे समजले जाणारे ग्लेन मॅक्सवेलने १२ धावा तर सुयश प्रभुदेसाईने १५ धावा केल्या. त्यानंतर शाहबाज अहमद ७ तर दिनेश कार्तिकने शून्य धावा केल्या. त्यामुळे RCBची अवस्था ४९ धावांत ७ बळी अशी झाली होती. हर्षल पटेलकडून RCBला काही धावांची अपेक्षा होती, पण टी नटराजनने भन्नाट आऊटस्विंग करत त्याला क्लीन बोल्ड केले. चेंडू स्टंपला लागताच स्टंप तीन-चार कोलांटी उड्या खात मागे जाऊन पडला. पाहा व्हिडीओ-
हर्षल पटेल ४ धावांवर बाद झाला. वानिंदू हसरंगाने १९ चेंडूत ८ धावांची झुंज दिली. मोहम्मद सिराजदेखील ४ चेंडूत २ धावा काढून बाद झाला. जोश हेजलवूड मात्र ३ धावांवर नाबाद राहिला. मार्को जेन्सनने २५ धावांत ३ तर टी नटराजनने १० धावांत ३ बळी टिपले. जगदीशन सुचिथने २ बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक दोघांनाही १-१ बळी मिळाला.