ठळक मुद्देमराठा अरेबियन्स संघाचा सोपा विजयबंगाल टायगर्सवर 9 विकेट्स राखून केली मात हजरातुल्लाह जाझई 76 धावांची खेळी
शारजा, टी-10 लीग : मराठा अरेबियन्स संघाने शुक्रवारी टी-10 लीगमध्ये बंगाल टायगर्स संघावर नऊ विकेट राखून विजय मिळवला. बंगालचे 91 धावांचे माफक लक्ष्य मराठाने 8.2 षटकांत 1 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. अॅलेक्स हेल आणि हजरातुल्लाह जाझई यांनी मराठा संघाचा विजय निश्चित केला. जाझईने 35 चेंडूंत 76 धावा केल्या. त्यात 10 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. विजयासाठी एक धाव आवश्यक असताना तो बाद झाला.
मराठा अरेबियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बंगाल टायगर्सचा निम्मा संघ अवघ्या 57 धावांत माघारी परतला होता. जेसन रॉयने 27 धावांची जलद खेळी करून बंगाल संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून दिली, परंतु ड्वेन ब्राव्होने त्याला बाद केले. जेम्स फॉल्कनरने दोन विकेट घेत मराठा संघाला यश मिळवून दिले. त्यानंतर रशीद खानने बंगालला आणखी एक धक्का दिला. त्याने अफगाणिस्तान संघातील सहकारी मोहम्मद नबीला बाद केले. या धक्क्यानंतर बंगाल संघाला सावरता आले नाही. त्यांना 10 षटकांत 7 बाद 91 धावा करता आल्या. लक्षाचा पाठलाग करताना अॅलेक्स हेल आणि हजरातुल्लाह जाझई यांनी मराठा संघाला दमदार सुरुवात करून दिली. बंगालच्या क्षेत्ररक्षकांनी तीन सोपे झेल सोडल्याने मराठा संघाला मदत मिळाली. जाझईने 27 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. जाझईने 35 चेंडूंत 76 धावा केल्या. त्यात 10 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. संघाला विजयासाठी एक धाव आवश्यक असताना तो बाद झाला. झहीर खानने त्याला बाद केले. 9 व्या षटकात रशीद खानने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. अॅलेक्सने नाबाद 15 धावा केल्या.