दुबई : डिसेंबर २०१७मध्ये दिमाखात पार पडलेल्या टी१० क्रिकेट लीग स्पर्धेचा थरार अद्यापही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात असतानाच आता पुढील सत्रामध्ये स्पर्धेत आणखी दोन संघांचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा स्पर्धा आयोजकांनी केली आहे. शारजाह येथे झालेल्या टी१० लीगच्या पहिल्या सत्रात मिळालेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहता आयोजकांनी संघ वाढविण्याचा निर्णय घेतला असून आता या लीगमध्ये एकूण ८ संघांचा थरार पाहण्यास मिळेल.
क्रिकेटविश्वात धडाकेबाज कामगिरीसह आपली छाप पाडलेल्या स्टार क्रिकेटपटूंच्या सहभागामुळे क्रिकेटप्रेमींना केवळ ९० मिनिटांच्या सामन्यात रोमांचकता अनुभवण्याची संधी मिळाली होती. स्पर्धेच्या पहिल्या सत्रासाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते. लीगच्या पहिल्या सत्रामध्ये बंगाल टायगर्स, केरळा किंग्ज, मराठा अरेबियन्स, पख्तून्स, पंजाबी लिजंड आणि टीम श्रीलंका या सहा संघाचा समावेश होता.
‘नव्या मोसमामध्ये दोन नव्या संघांचा समावेश करणार असून यामुळे क्रिकेटप्रेमींना आणखी रोमांच अनुभवण्याची संधी मिळेल. दोन नव्या संघांच्या समावेशासह स्पर्धेचा कालावधीही चार दिवसांहून आठ किंवा दहा दिवसांचा करण्यात येईल. त्याचबरोबर लीगमधील सामने शारजाहसह दुबई येथेही खेळविण्यात येतील. पहिल्या सत्राच्या मोठ्या यशानंतर दुसºया सत्रामध्ये अनेक नवे बदल पाहण्यास मिळतील,’ अशी माहिती टी१० लीगचे चेअरमन शाजी उल मुल्क यांनी दिली. टी१० क्रिकेट लीग स्पर्धेच्या आगामी सत्रातील नव्या संघांसाठी डेक्कन, सिंध, मेनन, मारवाडीज्, बलुच, आंध्र, गुजरात, फता आणि काबुल अशी नावे सुचविण्यात आली आहेत.
स्पर्धेत येणाºया दोन संघांपैकी एका संघाचे नाव पाकिस्तान आणि भारतीय शहर किंवा राज्यावर आधारित असेल. यासाठी आम्ही इच्छुक संघ मालकांना काही नावेही सुचवली आहेत.
- शाजी उल मुल्क, चेअरमन, टी१० क्रिकेट लीग
Web Title: In T10, the number of teams will increase, instead of six, eight teams will compete for the title
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.