Ind Vs Pakistan Live Match Highlight : हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग यांनी पाकिस्तानला हादरवून सोडले. भुवी व आवेश खान यांनी सुरुवातीला धक्के दिल्यानंतर हार्दिकने ३ विकेट्स घेत पाकिस्तानची मधली फळी विस्कळीत करून टाकली. १९व्या षटकात भुवीने सलग दोन चेंडूवर विकेट्स घेऊन भारताच्या विजयाचा मजबूत पाया रचला. पण, इतकं सगळं होऊनही भारतीय संघावर कारवाई झाली आणि पाकिस्तानची लॉटरी लागली. मात्र, त्यांना त्याचा फायदा उचलता आला नाही.
Urvashi Rautela स्टेडियममध्ये पण Rishabh Pant संघाबाहेर, Photo Viral होताच बनल्या भन्नाट मीम्स
भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात पाकिस्तानला हादरवले. मोहम्मद रिझवानसाठी दोन वेळा LBW ची अपील त्या षटकात झाली. भुवनेश्वरने त्याच्या दुसऱ्या षटकात पाकिस्तानला मोठा धक्का दिला. कर्णधार बाबर आजम १० धावा करून अर्षदीप सिंगच्या हाती झेल देऊन माघारी परतला. भुवीने या विकेटसह एका वर्षात पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक १३ विकेट्स घेण्याच्या आशिष नेहराच्या ( २०१६) विक्रमाशी बरोबरी केली. आवेश खानने सहाव्या षटकात १३ धावा दिल्या खऱ्या, परंतु सेट जोडी तोडली. त्याने फखर जमानला १० धावांवर बाद केले. आवेशने टाकलेला चेंडू चांगला उसळी घेत फखरच्या बॅटीजवळून दिनेश कार्तिकच्या हाती विसावला. कार्तिकने अपील करण्याआधीच फखरने खिलाडूवृत्ती दाखवताना माघारी जाण्याचा निर्णय घेतला.
इफ्तिखार अहमद व मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करताना पाकिस्तानची गाडी रुळावर आणली. त्यात युजवेंद्र चहलने अहमदला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल सोडून जीवदान दिले. हार्दिक पांड्याने वेगवान मारा करताना अप्रतिम बाऊन्सर टाकून अहमदला २८ धावांवर बाद केले. यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने अफलातून झेल घेतला. रिझवान ४३ धावा करून खेळपट्टीवर खिंड लढवत होता, परंतु त्यालाही हार्दिकने वेगवान माऱ्याने झेल देण्यास भाग पाडले. हार्दिकने १५ व्या षटकात रिझवानपाठोपाठ खुशदील शाहची ( २) विकेट घेत पाकिस्तानला धक्क्यांमागून धक्के दिले. भुवनेश्वरला पुन्हा गोलंदाजीसाठी आणण्याचा डाव यशस्वी ठरला अन् आसीफ अली ( ९) माघारी परतला.
हार्दिकने २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भुवीने २६ धावांत चार धक्के दिले. पण, षटकांचा वेग संथ ठेवल्यामुळे भारताला पेनल्टी बसली आणि अखेरच्या २ षटकांत ३० यार्डाच्या आत ५ खेळाडूंना उभे करावे लागले. त्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठे फटके मारून धावांचा डोंगर वाढवता आला असता, परंतु भुवीने १९व्या षटकात दोन धक्के देऊन पाकिस्तानची हवा काढली.