Ind Vs Pakistan Live Match । नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने आहेत. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाज गारद झाल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार बाबर आझम अवघ्या १० धावांवर तंबूत परतला, त्याला भुवनेश्वर कुमारने आपल्या दुसऱ्या षटकात बाद केले. पाकिस्तानच्या संघाने २० षटकात सर्वबाद १४७ धावा करून भारताला विजयासाठी १४८ धावांचे आव्हान दिले आहे. पाकिस्तानकडून गडी बाद होण्याचे सत्र सुरूच होते मात्र मोहम्मद रिझवानने एकतर्फी झुंज देऊन शंभरीचा आकडा गाठला.
पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ४३ धावा केल्या तर इफ्तिखार अहमदने २८ धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही खेळाडूंना वगळता कोणत्याच पाकिस्तानी फलंदाजाला खेळपट्टीवर जम धरता आला नाही. अखेरच्या काही चेंडूंमध्ये शाहनवाज दहानीने ताबडतोब खेळी करून पाकिस्तानच्या आशा पल्लवीत केल्या. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानला आपल्या डावाची संपूर्ण २० षटके देखील खेळता आली नाहीत आणि संघ २०व्या षटकाचा १ चेंडू राहिला असताना सर्वबाद झाला.
तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच पाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरूवात केली. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानला २ गडी गमावून अवघ्या ४३ धावा करता आल्या, याचाच फायदा घेऊन भारताने सामन्यात पकड बनवण्यास सुरूवात केली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ बळी पटकावले तर हार्दिक पांड्याला ३ बळी घेण्यात यश आले. तसेच अर्शदीप सिंग (२) आणि आवेश खानने १ बळी पटकावला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी.