Ind Vs Pakistan । नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) आमनेसामने होते. चुरशीच्या या लढतीत अखेर भारतीय संघाने विजय मिळवून टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. दोन्हीही संघांनी शानदार क्रिकेट खेळून चाहत्यांचे मनोरंजन केले, मात्र पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना हा पराभव जिव्हारी लागला आहे. पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, बाबर आझमने सलामीला खेळणे म्हणजे मोठी चूक असल्याचे अख्तरने म्हटले. तसेच भारतीय संघाची देखील संघनिवड चुकली असल्याचा जावई शोध शोएब अख्तरने लावला. रोमहर्षक सामन्यात अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ६ चेंडूंत ७ धावांची आवश्यकता होती. अखेरचे षटक घेऊन आलेल्या मोहम्मद नवाजने पहिल्याच चेंडूवर जडेजाचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या चेंडूंवर दिनेश कार्तिकने १ धाव काढून हार्दिक पांड्याला फलंदाजी करण्याची संधी दिली. चौथा चेंडू डॉट गेला असता ३ चेंडूंत ७ धावांची आवश्यकता होती. अखेर तिसऱ्या चेंडूंवर हार्दिकने षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व राहिले, भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ बळी पटकावले तर हार्दिक पांड्याला ३ बळी घेण्यात यश आले. तसेच अर्शदीप सिंग (२) आणि आवेश खानने १ बळी पटकावला.
शोएब अख्तरने साधला निशाणा
व्हिडीओ शेअर करत शोएबने म्हटले, "पाकिस्तानने सर्वात धीमी गतीने धावा केल्या असून संघाने पहिल्या 6 षटकात 19 चेंडू डॉट खेळले. दोन्हीही संघातील कर्णधारांची संघनिवड चुकली दोघांनांही योग्य संघ निवडता आला नाही. भारताने रिषभ पंतला वगळले तर आम्ही इफ्तिखारला चौथ्या क्रमांकावर खेळवले. त्यामुळे विचार करण्याची गोष्ट आहे की बाबर आझमने सलामीवीर म्हणून खेळू नये. त्याने दुसऱ्या क्रमांकावर खेळले पाहिजे", असे शोएब अख्तरने अधिक म्हटले.
भारताची विजयी सलामी
भारताच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. संघाचा सलामीवीर फलंदाज के.एल राहुल आपल्या पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला. त्याला टी-२० मध्ये पदार्पण केलेल्या नसीम शाहने बाद केले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. किंग कोहलीने मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करून ३५ धावांची साजेशी खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने प्रभावशाली २९ चेंडूंत ३५ धावांची खेळी केली, तर विराट कोहली (३५), रोहित शर्मा (१२), सूर्यकुमार यादव (१८) आणि हार्दिक पांड्याने नाबाद ३३ धावांची खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
Web Title: T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight Tightly fought match by both teams played poor cricket at times shoaib akhtar angry on both team captains
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.