India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी भारताला स्फोटक सुरुवात करून दिली. दोघांनी ४.२ षटकांत भारताला अर्धशतकी पल्ला गाठून देताना पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. पण, ८ धावांच्या अंतराने दोघंही बाद झाले. रोहितला बाद करण्यात पाकिस्तानला यश आले, परंतु त्यांनी जगासमोर स्वतःचं हसं करून घेतलं. पण, नाणेफेकीच्या वेळेस झालेला झोल सर्वांसमोर आला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याला हेड/टेल पैकी जाहीर करायचे होते आणि रोहितने टॉस उडवला... त्यानंतर जे घडले त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला...
रोहित शर्माची विकेट घेतली, परंतु पाकिस्तानने जगासमोर करून घेतलं स्वतःचं हसू, Video
रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी पहिल्याच षटकात आपला इरादा दाखवून दिला. नसीम शाहच्या पहिल्याच षटकात रोहितने खणखणीत चौकार व षटकार खेचला. तिसऱ्या षटकात लोकेशने नसीमच्या गोलंदाजीवर दोन षटकार खेचले. हॅरीस रौफला रोहितने झोडले अन् या दोघांनी ४.२ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. सहाव्या षटकात रौफच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहितने टोलावलेला चेंडू हवेत उंच गेला अन् खुशदिल शाहने तो टिपला. फाखर जमान व खुशदिल यांच्यात कॅचसाठी टक्कर झाली, परंतु नशीबाने पाकिस्तानची साथ दिली. रोहित १६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून २८ धावांत माघारी परतला. शादाब खानने त्याच्या पहिल्याच षटकात भारताचा दुसरा सलामीवीर लोकेशला ( २८) माघारी जाण्यास भाग पाडले. भारताला ८ धावांच्या अंतराने दोन धक्के बसले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १४ वेळा ५०+ भागीदारी करण्याचा विक्रम रोहित-लोकेशने नावावर केला. त्यांनी आयर्लंडच्या पॉल स्टीर्लिंग व केव्हिन ओ'ब्रायन यांचा ( १३) विक्रम मोडला.
सूर्यकुमार यादव व विराट कोहलीने डाव सावरला होता, परंतु षटकार मारण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार ( १३) झेलबाद झाला. विराट व त्याने २९ धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या १० षटकांत ३ बाद ९३ धावा केल्या. भारताने १०.४ षटकांत शतक पूर्ण केले आणि पाकिस्तानविरुद्धचे ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारताचे सर्वात जलद शतक ठरले. रिषभ पंतला आज मोठी खेळी करण्याची संधी होती, पंरतु तो १४ धावा करून शादाबच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने विराटसह २५ चेंडूंत ३५ धावा केल्या. हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला.
नाणेफेकीचा गोंधळ...रोहितने टॉस उडवला अन् बाबरने टेल म्हटले... शास्त्रींनी तेव्हा बाबरने हेड म्हटल्याचे जाहीर केले , टॉस जमिनीवर पडला तेव्हा मॅच रेफरी संभ्रमात पडले. त्यांनी चूक सुधारली अन् पाकिस्तानने नाणेफेक जिंकल्याचे रोहितला सांगितले.