India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : मोहम्मद रिझवान व मोहम्मद नवाज या जोडीने ७३ धावांची भागीदारी करून सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकवला. भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने मोक्याच्या क्षणी ही भागीदारी तोडली अन् सामना रंजक झाला. हार्दिक पांड्याने पुढील षटकात रिझवानची विकेट घेत सामना पूर्णपणे पलटवून टाकला. रवी बिश्नोईने टाकलेल्या १८व्या षटकात आसीफ अली ( Asif Ali) साठी जोरदार अपील झाले. रिषभ पंतने झेल टिपल्याचा दावा केला अन् रोहितने DRS घेतला. अल्ट्रा एजमध्ये बॉल व बॅटचा संपर्क झाल्याचे दिसले, परंतु तिसऱ्या अम्पायरने नाबाद दिले. अर्षदीप सिंगने सोपा झेल सोडला अन् तिथेच भारताच्या हातून सामनाही पूर्णपणे गेला. पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेतील हिशोब चुकता केला.
१८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा बाबर आजम १४ धावांवर बाद झाला. मोहम्मद रिझवान व फाखर जमान यांनी ४१ धावांची भागीदारी करताना पाकिस्तानचा डाव सावरला होता. युजवेंद्र चहलने चतुराईने ही भागीदारी संपुष्टात आणताना फाखरला ( १५) बाद केले. पाकिस्तानला ६३ धावांवर दुसरा धक्का बसला. रिझवानला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्याच्या पाय मुरगळला होता आणि तो फलंदाजीला येईल की नाही याबाबत साशंकता होती. पण, तो आला अन् दमदार खेळ करत अर्धशतकही पूर्ण केले. भारतासमोर तोच एक मोठा अडथळा होता. रिझवान व नवाज यांनी सामन्याचे चित्र बदलले आणि ३० चेंडूंत ४७ धावा अशी मॅच फिरवली. युजवेंद्र चहलच्या चौथ्या षटकात १६ धावा चोपल्या. चहलने ४ षटकांत ४३ धावा देताना १ विकेट घेतली.
भुवनेश्वर कुमारने १६व्या षटकात पाकिस्तानला धक्का दिला. नवाज २० चेंडूंत ६ चौकार व २ षटकार खेचून ४२ धावांवर झेलबाद झाला. नवाज व रिझवान यांनी ४१ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली. भुवीच्या त्या षटकात ४ धावाच आल्या. वेगाने धावा वाढवण्याच्या प्रयत्नात रिझवानही १७व्या षटकात हार्दिकच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रिझवानने ५१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७१ धावा केल्या. १२ चेंडूंत २६ धावा हव्या असताना भुवीच्या १९व्या षटकात १९ धावा आसीफ व खुशदिल शाहने चोपल्या. पाकिस्तानला ६ चेंडूंत ७ धावा हव्या होत्या. ३ चेंडूंत २ धावा हव्या असताना अर्षदीपने पाकिस्तानच्या आसीफ अलीला ( १६ धावा ८ चेंडू) बाद केले. इफ्तिकार अहमदने सरळ फटका मारून दोन धावा करताना पाकिस्तानला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला.
विराट कोहलीचे अर्धशतक अन् दमदार फटकेबाजी... रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी पहिल्याच षटकात आपला इरादा दाखवून दिला. या दोघांनी ४.२ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. रोहित १६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून २८ धावांत माघारी परतला. ८ धावांच्या अंतराने लोकेश ( २८) माघारी परतला. सूर्यकुमार यादव ( १३) व विराट कोहलीने २९ धावांची भागीदारी केली. रिषभ पंतने ( १४) आज मोठी खेळी करण्याची संधी गमावली. हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. विराटने ३६ चेंडूंत ट्वेंटी-२०तील ३२वे अर्धशतक झळकावले. त्याने रोहितचा ३१ अर्धशतकांचा विक्रम मोडला. दीपक हुडाने काही सुरेख फटके मारले, परंतु तो १६ धावांवर बाद झाला. विराटसह त्याने २४ चेंडूंत ३७ धावांची भागीदारी केली. रवी बिश्नोईने अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार खेचून भारताला ७ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारून दिली. विराटने ४४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार मारून ६० धावा चोपल्या.