T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान यांच्यात आज आणखी एक महामुकाबला होणार आहे. सुपर ४ मधील लढतीत भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार आहेत. आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता आणि त्याची परतफेड करण्यासाठी बाबर आजमचा संघ सज्ज आहे. दोन्ही संघांना दुखापतीचे ग्रहण लागले आहे. त्यात पाकिस्तानचे माजी खेळाडू काहीही बरळत आहेत. मोहम्मद हाफिजनंतर आता माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी अशी विधानं करून रोहितचे खच्चिकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात १८ चेंडूंत १२ धावा करता आल्या, तर हाँगकाँगविरुद्ध त्याला १३ चेंडूंत २१ धावा करता आल्या. या दोन्ही सामन्यांत रोहितला मोठी खेळी करता आली नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे माजी खेळाडू संधी साधून टीका करत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार हाफिजने ३५ वर्षीय रोहितची देहबोली कमकुवत वाटतेय. तो घाबरलेला व गोंधळलेला दिसतोय. त्याच्यावर कर्णधारपदाचं दडपण जाणवतंय आणि त्याला काही समस्यांना तोंड द्यावं लागतंय, असा दावा केला. हाफिजने पुढे जाऊन असे म्हटले की, रोहित फार काळ कर्णधारपदावर कायम राहणार नाही.
त्यात आता अख्तरची भर पडली आहे. त्याने म्हटले की, रोहित शर्मा कर्णधारपदाच्या ओझ्याखाली अडकला आहे. तो या जबाबदारीचा आनंद घेताना दिसत नाही आणि त्याचे प्रचंड दडपण घेतलं आहे. त्यामुळेच त्याची कामगिरी खराब होतेय. ट्वेंटी-२०त हार्दिक पांड्या हा कर्णधारपदाचा सक्षम दावेदार आहे. त्याने दुखापतीतून सावरल्यानंतर दमदार पुनरागमन केले आहे आणि गुजरात टायटन्सला त्याने आयपीएल २०२२चे जेतेपदही जिंकून दिले आहे.
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ( Rohit) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ३५००+ धावांचा टप्पा ओलांडला आणि असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला. शिवाय त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२००० धावांचा टप्पाही पार केला.