India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : भारतीय संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. आता सुपर ४ मध्ये India vs Pakistan पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत. पण, दोन्ही संघांना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने आजच्या सामन्यात एक बदल केला असून भारतीय संघात तीन बदल पाहायला मिळत आहेत. पण, नाणेफेकीच्या वेळी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) समालोचन करणार आहेत. त्यांची खास शैली ऐकण्यासाठी क्रिकेट चाहत्यांचे कान आतुरले आहेत. अशात शास्त्रींनी नाणेफेकीच्या वेळीच वातावरण निर्मिती केली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा व पाकिस्तानचा बाबर आजम यांना हसू आवरले नाही.
पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुखापतग्रस्त शाहनवाज दहानीच्या जागी पाकिस्तानने मोहम्मद हस्नैनला संधी दिली आहे. भारतीय संघात तीन बदल पाहायला मिळाले. हार्दिक पांड्याचे पुनरागमन झाले असून रवी बिश्नोई व दीपक हुडा आज प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत. दीनेश कार्तिकच्या जागी रिषभ पंत यष्टिंमागे दिसणार आहे. रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, अर्षदीप सिंग, युजवेंद्र चहल या अकरा खेळाडूंसह भारतीय संघ आज मैदानावर उतरला आहे.
रवी शास्त्री काय म्हणाले...भारत-पाकिस्तान यांच्यातल्या राऊंड दोनच्या सामन्याच्या नाणेफेकीचा वेळ आली... ग्रीन जर्सीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम व ब्लू जर्सीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा माझ्यासोबत आहेत. ( साधारण अशी घोषणा बॉक्सिंगच्या सामन्यात केली जाते) शास्त्रींचे हे बोलणे ऐकून रोहित व बाबर हसू लागले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.