India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी भारताला स्फोटक सुरुवात करून दिली. या दोघांची विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) डाव सावरला. विराटने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२०तील हे पाकिस्तानविरुद्ध विराटचे चौथे अर्धशतक ठरले. त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम नावावर करताना रोहितला मागे टाकले. भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.
रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी पहिल्याच षटकात आपला इरादा दाखवून दिला. नसीम शाहच्या पहिल्याच षटकात रोहितने खणखणीत चौकार व षटकार खेचला. या दोघांनी ४.२ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. सहाव्या षटकात रौफच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहितने टोलावलेला चेंडू हवेत उंच गेला अन् खुशदिल शाहने तो टिपला. रोहित १६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून २८ धावांत माघारी परतला. शादाब खानने त्याच्या पहिल्याच षटकात भारताचा दुसरा सलामीवीर लोकेशला ( २८) माघारी जाण्यास भाग पाडले.
सूर्यकुमार यादव व विराट कोहलीने डाव सावरला होता, परंतु षटकार मारण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार ( १३) झेलबाद झाला. विराट व त्याने २९ धावांची भागीदारी केली. भारताने १०.४ षटकांत शतक पूर्ण केले आणि पाकिस्तानविरुद्धचे ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारताचे सर्वात जलद शतक ठरले. रिषभ पंतला आज मोठी खेळी करण्याची संधी होती, पंरतु तो १४ धावा करून शादाबच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. विराट आज चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने ३६ चेंडूंत अर्धशतक झळकावले. आज संधी मिळालेला दीपक हुडा १६ धावांवर बाद झाला. विराटसह त्याने २४ चेंडूंत ३७ धावांची भागीदारी केली. विराट ४४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार मारून ६० धावांवर बाद झाला. रवी बिश्नोईने अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार खेचून भारताला ७ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारून दिली.