बर्मिंगहॅम बिअर्सचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट ( Birmingham Bears skipper Carlos Brathwaite) याने ट्वेंटी-20 ब्लास्ट स्पर्धेत डर्बिशायर संघाविरुद्धच्या सामन्यात चूक केली आणि त्यामुळे संघाला 5 धावांची पेनल्टी बसली. डर्बिशायरने हा सामना 7 विकेट्स राखून सहज जिंकला. सामन्याच्या दुसऱ्या डावातील 13व्या षटकात हा प्रसंग घडला. जेव्हा कार्लोस गोलंदाजी करत होता आणि स्ट्राईकवर वेन मॅडसेन होता. त्याने डिफेन्सिव्ह फटका मारला आणि चेंडू कार्लोसकडे रिटर्न गेला. मॅडसेनला रन आऊट करण्यासाठी कार्लोसने चेंडू फलंदाजाच्या दिशेने फेकला. तो चेंडू मॅडसेनला लागला आणि यावरून अम्पायरने दंड ठोठावला.
कार्लोसने त्यानंतर माफी मागितली, परंतु अम्पायरने संघाला 5 धावांची पेनल्टी दिली. अम्पायरच्या या निर्णयावर कार्लोस नाराज दिसला.
कार्लोसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सॅम हेन ( 73), अॅडम होस( 20), ख्रिस बेंजामिन ( 13) व कार्लोस ( 18) यांच्या खेळीच्या जोरावर बर्मिंगहॅमने 159 धावा केल्या. सॅम्युएल कॉनर्सने तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात डर्बीशायरच्या शान मसूद ( 45) आणि लुईस रिस ( 38) यांनी दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये 50 धावांची भागीदारी केली. रिस बाद झाल्यानंतर मॅडसेनने 55 धावा चोपल्या.