हैदराबाद : गेल्या लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर भारतीय संघ आज (शुक्रवारी) आॅस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक तिस-या व अखेरच्या टी-२० सामन्यात चुकांपासून बोध घेत मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय नोंदवल्यानंतर भारताने रांचीमध्ये पहिल्या टी-२० सामन्यात ९ गडी राखून विजय मिळवला होता, पण गुवाहाटीमध्ये यजमान संघाला पराभव स्वीकारावा लागला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध अलीकडेच मिळवलेल्या यशानंतरही कर्णधार विराट कोहलीने म्हटले की, त्यांना पराभूत करणे नेहमीच कठीण असते. गुवाहाटीमध्ये ८ गडी राखून विजय मिळवल्यानंतर आॅस्ट्रेलिया संघ निर्णायक लढतीत उंचावलेल्या मनोधैर्यासह उतरणार आहे. गुवाहाटीमध्ये फिरकीपटू अपयशी ठरले असले तरी कर्णधार संघात बदल करीत अक्षर पटेलला संधी देण्याची शक्यता धूसर आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये आशिष नेहरा बाहेर राहणार असल्याचे निश्चित आहे.
विजयासह करायचा भारत दौ-याचा अखेर : हेड
हैदराबाद : आॅस्ट्रेलियन फलंदाज ट्रेव्हिस हेड उद्या, शुक्रवारी येथे भारताविरुद्ध होणाºया तिसºया आणि निर्णायक टी-२0 आंतरराष्ट्रीय सामन्यातील आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छितो. हेड म्हणाला, ‘‘मॅच विनिंग पार्टनरशिपचा भाग असणे चांगले होते. फलंदाज म्हणून तुमची खेळपट्टीवर टिकून आॅस्ट्रेलियाला विजयी करण्याची इच्छा असते आणि आम्ही असे करण्यात यशस्वी ठरलो. उद्याही याआधीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करु अशी आशा करतो. जर सामना जिंकण्यास गोलंदाजही शानदार कामगिरी करतील तर ते खूपच लाभदायक ठरेल.’’
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असून चाहत्यांना धावांचा पाऊस अनुभवाला मिळण्याची शक्यता आहे. येथे नियमित आयपीएलचे सामने होतात, पण टी-२० आंतरराष्ट्रीय सामना प्रथमच होत आहे. शुक्रवारी येथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आॅस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत एक सामना जिंकला होता; पण गुवाहाटीमध्ये त्यांची कामगिरी बघितल्यानंतर त्यांना सूर गवसल्याचे संकेत मिळत आहेत. नियमित कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने चांगली चांगली कामगिरी केली आहे.
प्रतिस्पर्धी संघ-
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, मनीष पांडे, एम. एस. धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, आशिष नेहरा, दिनेश कार्तिक, के. एल. राहुल आणि अक्षर पटेल.
आॅस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जेसन बेहरेंडोर्फ, डॅन ख्रिस्टियन, नॅथन कुल्टर नाईल, अॅरोन फिंच, ट्रॅव्हिस हेड, मोइसेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, केन रिचर्डसन, अॅडम जम्पा, मार्क्स स्टोइनिस, अॅण्ड्र्यू टाय.
Web Title: T20 cricket: The determination of winning the series against India, the decisive and third match against Australia today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.