नैरोबी - क्रिकेटच्या मैदानात दररोज नवनवे विक्रम रचले जातात. तर जुने रेकॉर्ड मोडले जातात. दरम्यान, रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड घडला आहे. केनियाने एका टी-२० सामन्यात मालीच्या संघाला १०५ चेंडू आणि १० विकेर्ट राखून पराभूत केले. केनियाने हा सामना अवघा १५ चेंडूत जिंकला.
रविवारी सर्वांचे लक्ष हे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्याकडे होते. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि टीम साऊदीने विक्रमी कामगिरी करून नवे विक्रम रचले. मात्र दुसरीकडे केनिया आणि माली यांच्यातील सामन्यातही नवा रेकॉर्ड रचला गेला. आयसीसी टी-२० वर्ल्डकप सब रीजनल आफ्रिका क्वालिफायर ए सामन्यामध्ये हा विक्रम रचला गेला. केनियाने मालीला १०५ चेंडू राखून पराभूत केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूंचा विचार केल्यास हा सर्वात मोठा विजय आहे.
या सामन्यात माली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र केनियाच्या भेदक माऱ्यासमोर त्यांची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. केवळ ८ धावांत मालीने ६ विकेट्स गमावले. माली संघाकडून थिओडोर मेकालूने १० चेंडूत दहा धावा काढल्या. त्याचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आलेला नाही. मालीचा संपूर्ण संघ १०.४ षटकात ३० धावांत गारद झाला.
केनियाकडून पीटर लेंगाट याने ६ विकेट्स टिपल्या. त्यानंतर केनियाने अवघ्या २.३ षटकांत म्हणजेच १५ चेंडूत या आव्हानाचा पाठलाग केला. केनियाचा सलामीवीर पुष्कर शर्माने १४ आणि कॉलिन्स ओबुयाने १८ धावा काढत संघाला विजय मिळवला.