राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 

Cricket: T20 World Cup 2024 : शालीनता आणि सभ्यपणासह कठोर मेहनत यावरचा विश्वास कधी डळमळीत झालाच तर आठवावं, की आपल्या अवतीभोवती कुठंतरी राहुल द्रविडही असतोच.

By Meghana.dhoke | Published: July 3, 2024 07:02 PM2024-07-03T19:02:29+5:302024-07-03T19:11:21+5:30

whatsapp join usJoin us
t20 cricket world cup 2024 : Magic of Rahul Dravid, how Rahul Dravid as a coach lead Indian team towards victory. | राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 

राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेघना ढोके

१७ मार्च २००७चा तो दिवस अजून आठवतो. काही दु:ख काळासोबत कोरडी होतात; पण ती सरत नाहीत, आठवलं तरी ती ठसठस जाणवते. वेस्ट इंडिजमध्येच भरलेला विश्वचषकाचा मेळा. त्रिनिदादला भारत-बांगलादेश सामन्याचा हा दिवस. भारतीय संघ पूर्ण ५० ओव्हर्सही न खेळता फक्त १९१ धावा करून बाद झाला. परिणाम व्हायचा तोच झाला, भारतीय संघाला अतिशय लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशचे खेळाडू अत्युच्च आनंदाने सेलिब्रेशन करत असताना भारतीय संघ सुतकी चेहऱ्यानं बसलेला होता. संघाचा कप्तान राहुल द्रविड नखं कुरतडत सुन्न बसून होता. याच साखळीत श्रीलंकेनंही भारतीय संघाला हरवलं. नामुश्की पत्करून भारतीय संघ वेस्ट इंडिजमधून परतला. पुढे भारतीय संघानं त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये टी-२० विश्वचषक जिंकला, नंतर २०११ला एकदिवसीय कपही जिंकला. (अर्थातच दोन्ही संघांत राहुल द्रविड नव्हताच.) वेस्ट इंडिजमधला तो पराभव मात्र तसाच ठसठसत होता.

आणि मग उजाडला २९ जून २०२४. ज्या वेस्ट इंडिजमध्ये तत्कालीन संघाचा कप्तान असलेल्या राहुल द्रविडला नामुश्की पत्करावी लागली, त्याच वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक विजेत्या संघाने प्रशिक्षक राहुल द्रविडला शब्दश: डोक्यावर घेतलं. १७ वर्षांत जग किती बदललं, सोबत राहुल द्रविडनेही बदलली भारतीय संघासाठी एक गोष्ट! मैदानात न उतरता प्रतिस्पर्ध्यांना तर मात दिलीच; पण भारतीय संघाला कायम हरवणाऱ्या एका गोष्टीलाही नमवून दाखवलं!

‘चक दे इंडिया’ सिनेमात प्रशिक्षक कबीर खान आपल्या संघाच्या कप्तानाला म्हणतो, की जिस वजह से मेरी टीम हारी, मैं उस वजह को एक बार हराना चाहता हूं! ते त्या सिनेमात खरं झालं तसंच भारतीय क्रिकेट संघातही. खरं तर या गोष्टीचा समारोप १९ नोव्हेंबर २०२३ रोजीच व्हायचा होता; पण त्याही अंतिम सामन्यात दबावाखाली संघ पुन्हा ढेपाळलाच. विश्वचषक गमावला; पण एकजुटीच्या सूत्रात बांधलेल्या संघानं पुढच्या सहा महिन्यांत टी-२० विश्वचषक (स्पर्धेत एकदाही न हरता) जिंकून दाखवला. कप्तान-खेळाडू या सगळ्यांचंच ते यश आहे, पण त्या यशाचा मोठा मानकरी ठरला राहुल द्रविड. या विश्वचषकात संघ जी ‘टेम्प्लेट’ घेऊन खेळला ती टेम्प्लेट दिली द्रविडने!
स्वत:साठी नाही टीमसाठी खेळण्याची, स्वत:चा विचार न करता टीमचा विचार करण्याची आणि आपल्या क्षमतेच्या दोन पावलं पुढे जात ‘फिअरलेस’ खेळण्याची ही घुटी द्रविड आपल्या मृदू शैलीत देत राहिला. ‘टीम फर्स्ट’ हे तत्त्व आयुष्यभर जगणाऱ्या द्रविडने त्याच तत्त्वाने विश्वचषक जिंकण्याची कमाल करून दाखवली. कुणीच एकच एक मोठा हिरो न ठरताही संघातला प्रत्येक खेळाडू संधी मिळाली तेव्हा उत्तम खेळला आणि संघ जिंकेल म्हणून झोकून देऊ लागला.

द्रविडने आयुष्यभर हेच केलं होतं. गुगल केलं तर आकडेवारीचे वाट्टेल तेवढे रकाने मिळतील, ते आकडे हेच सांगतात की द्रविड ‘वॉल’ होऊन उभा राहिला तेव्हा-तेव्हा संघ जिंकला.
तेंडुलकर, सेहवाग, गांगुलीचे विक्रम झाले तेव्हाही बहुतांश वेळा द्रविड नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता. संघाला एक जास्तीचा बॅट्समन खेळवता यावा म्हणून ५० ओव्हर विकेट किपिंग करायलाही आनंदानं तयार झाला. तो स्लो खेळतो, असे आरोप झालेच; पण त्याची सरासरी तपासली तर सचिनच्या खालोखाल त्याचाच स्ट्राइक रेट दिसतो. संघाच्या गरजेसाठी स्वत:च्या खेळाला त्यानं कितीदा मुरड घातली. भारतीय संघ आणि पराभव यामध्ये तो कायमच ‘भिंत’ म्हणून उभा राहिला.
संकटाच्या परिस्थितीत सगळ्यात पुढे आणि जिंकण्याच्या/यशाच्या वेळी सर्वांच्या मागे उभं राहणारा, ज्याचं क्रेडिट त्याला देणारा हा खेळाडू. त्याचाच एक किस्सा म्हणजे अनिल कुंबळेने १० गडी बाद केले तो दिवस.
पत्रकार राजदीप सरदेसाई आपल्या डेमोक्रसीज इलेव्हन नावाच्या पुस्तकात तो किस्सा सांगतात.

अनिल कुंबळेनं इतिहास घडवला होता. भारताने पाकिस्तानला नमवत केलेला हा ऐतिहासिक विक्रम साजरा करायचा म्हणून सरदेसाई त्यांच्या चॅनलवर एक स्पेशल शो करणार होतो. या सिरीजसाठी एक्सपर्ट म्हणून राहुल द्रविडशी चॅनलचा करार झालेला होता. भारतीय संघ उतरला होता त्या हॉटेलवर द्रविडला घ्यायला चॅनलची कार पोहचली. पण द्रविडने यायला नकार दिला. त्यानं फोन करून सरदेसाईंना सांगितलं की, हा दिवस ऐतिहासिक आहे, रोज उठून काही कुणी बॉलर १० विकेट्स घेत नाही. आजचा दिवसच अनिलचा आहे, तू आज त्याची मुलाखत घ्यायला हवीस, माझी नाही!
कुंबळेला ‘त्याचं’ श्रेय मिळायलाच हवं म्हणून झटला तो द्रविड. स्वत: मागे राहून आपल्या सहकाऱ्याचं यश साजरा करणारा मोठं मन दाखवणारा द्रविड. त्यानं संघाआधी कधीही स्वत:चा विचार केला नाही आणि संघापेक्षा कुणी मोठा नाही हा विचार कधी सोडला नाही.
आयुष्यातला सगळ्यात मोठा वादही त्यानं यापायीच पत्करला.

पाकिस्तानातली मुलतान टेस्ट. २००४ मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर होता. सौरव गांगुलीऐवजी त्या सामन्यापुरता द्रविड तात्पुरता कप्तान होता. भारतीय क्रिकेटचं दैवत असलेला सचिन तेंडुलकर १९४ वर खेळत होता. द्विशतक करताना तो बऱ्यापैकी मंद झाला होता. त्याचवेळी द्रविडने डाव घोषित करून टाकला आणि सचिनला माघारी बोलावले. डाव समाप्तीच्या घोषणेची द्रविडने घाईच केली म्हणून त्याच्यावर अत्यंत घनघोर टीका झाली. ज्या देशात तसंही कुणा एका माणसाला हिरो करण्याचं, विक्रमांचं कौतुक मोठं, तिथे सचिनचं द्विशतक द्रविडनं हुकवलं म्हणून मोठी नाराजी पसरली. द्रविडने असं का केलं असेल, याचा जो-तो अंदाज बांधून आपल्या कल्पनाशक्तीचे तारे तोडू लागला. द्रविड मात्र नेहमीसारखाच स्थितप्रज्ञ होता, ठामपणे सांगत होता की, तो निर्णय त्यावेळी संघाच्या भल्यासाठी आवश्यक होता. व्यक्तिगत कामगिरीपेक्षा संघहित अधिक महत्त्वाचं असतं.

पुढे द्रविडने एका मुलाखतीत सांगितलंही की, ‘तिसऱ्या दिवसाचा खेळ संपत आला होता. बराच वेळ मैदानात उभं राहून पाकिस्तानी क्षेत्ररक्षक थकले होते, त्या अवस्थेत त्यांना बॅटिंगला उतरवणं संघाच्या हिताचं होतं. त्यात त्या दिवशी माझ्याकडे एक बॉलर कमी होता. (झहिर खान दुखापतग्रस्त होता.) आणि पाकिस्तान संघाला बाद करायचं तर आमच्या बॉलर्सकडे पुरेसा वेळ असणं महत्त्वाचं होतं. नेमकं झालं असं की, पाकिस्तानी संघ आमच्या माऱ्यापुढे कोसळला, चौथ्या दिवशीच मॅच संपली; पण हे असं होणार हे मला माहिती होतं का? त्यावेळी संघहिताचा विचार करता, आपला डाव घोषित करून थकलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना बॅटिंगला उतरवणंच मला जास्त गरजेचं वाटलं, मी ते केलं!’

संघापेक्षा मोठं कुणीच नाही, संघहितापेक्षा मोठं काहीच नाही हे तत्त्व घेऊन तो जन्मभर खेळला.
मोठे तामझाम सोडून इंडिया ‘अण्डर १९’च्या खेळाडूंचा प्रशिक्षक झाला. पुढे भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणूनही प्रत्येक अपयशाच्या वेळी कायम तोच पुढे झाला. २०२३ विश्वचषक फायनल हरल्यावरही पत्रकारांना सामोरा द्रविड गेला, त्यानं अपयशाची जबाबदारी स्वीकारली. आणि त्याउलट परवा संघ जिंकला तेव्हा त्यानं कप्तान रोहित शर्माकडे श्रेय जाईल, याची पूर्ण काळजी घेतली.

सार्वजनिक आयुष्यात वागण्याबोलण्याच्या ‘सभ्यतेचे’ मानदंडच त्यानं घालून दिले. अत्यंत दुर्मीळ होत चाललेलं हे शालीनतेचं तत्त्व त्यानं जिवापाड जपलं. आज सामाजिकच काय, वैयक्तिक आयुष्यातही माणसांचे ‘इगो’ मोठे झालेत, कर्तृत्वापेक्षा फुकाची बडबड आणि बड्याबड्या बातांचे ढोल वाजवत राहण्याचं प्रस्थ वाढलंय. सच्च्या-सच्छील-शालीन वर्तनाची जागा ‘मला पाहा, फुलं वाहा’ म्हणणाऱ्या चमको वृत्तीनं घेतली आहे.
त्या काळात कुणीतरी एकजण राहुल द्रविड असतो. जो शांतपणे काम करत असतो.
आपण ज्या काळात जगतो त्याच काळात राहुल द्रविडही असतो.
विजयाच्या क्षणीही तो एकच गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगत असतो, माझं काहीच नाही. मी कुणी नाही. जे आहे ते सगळ्यांचं आहे, आपलं आहे.

शालीनता आणि सभ्यपणासह कठोर मेहनत यावरचा विश्वास कधी डळमळीत झालाच तर आठवावं, की आपल्या अवतीभोवती कुठंतरी राहुल द्रविडही असतोच. आहेच..

(माहिती संदर्भ : डेमोक्रसीज इलेव्हन, भारतीय क्रिकेटची महान गाथा, लेखक : राजदीप सरदेसाई, अनुवाद : मेघना ढोके, मेहता प्रकाशन)

Web Title: t20 cricket world cup 2024 : Magic of Rahul Dravid, how Rahul Dravid as a coach lead Indian team towards victory.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.