बेंगळुरू : भारताचे लक्ष पूर्णपणे आगामी विश्वचषक स्पर्धेवर केंद्रित झाले आहे, पण बुधवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत मालिका बरोबरीत सोडविण्याच्या निर्धाराने उतरेल. भारतीय संघ दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने यापूर्वीच स्पष्ट केले की, ‘विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जवळपास निश्चित आहे, पण आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्यांनाही संधी मिळू शकते.’ विश्वचषक तयारीच्या दृष्टीने कोहली लोकेश राहुल व रिषभ पंत यांना जास्तीत जास्त संधी देऊ शकतो. यासाठीच नियमित सलामीवीर शिखर धवनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.
रोहित शर्मासह डावाची सुरुवात करण्यासाठी धवनला संधी मिळते की पुन्हा राहुल खेळणार, याची उत्सुकता आहे. पुनरागमन करणाºया बुमराहने शानदार गोलंदाजी केली, पण उमेश यादवने बºयाच धावा बहाल केल्या. त्याच्या स्थानी सिद्धार्थ कौलला किंवा विजय शंकरला संधी मिळू शकते.सर्वांची नजर महेंद्रसिंग धोनीवर आहे. त्याला पहिल्या सामन्यात संघर्ष करावा लागला. ३७ चेंडूत केवळ नाबाद २९ धावा केल्या. धोनीने आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये चांगली कामगिरी करीत टीकाकारांना गप्प केले होते, पण रविवारी त्याच्या संथ खेळीमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे, पहिल्या लढतीत भारताला रोखल्याने आसी संघ खूश आहे, पण फलंदाजी चिंतेचा विषय आहे. मजबूत स्थितीत असताना आॅस्ट्रेलियाने पहिल्या लढतीत अखेरच्या षटकात विजय मिळवला. त्यामुळे बुधवारी भारत सहज गुडघे टेकविणार नाही, याची त्यांना चांगली कल्पना आहे.