मुंबईः गेल्या काही वर्षांत सुरू झालेल्या लीग स्पर्धा या क्रीडा क्षेत्रासाठी खूपच फायद्याच्या आहेत. त्यामुळे मुलांनी फक्त क्रिकेटच असं नव्हे, तर कुठल्याही खेळाकडे करिअर म्हणून पाहायला हवं, असा सल्ला भारताचा विक्रमादित्य क्रिकेटवीर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज दिला. काही वर्षांपूर्वी पुरेशा संधी नसल्याने अनेक गुणवंत क्रीडापटू पुढे येऊ शकले नाहीत. देशासाठी खेळण्याची क्षमता असूनही त्यांना तिथवर पोहोचता आलं नाही. पण, आज क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस लीग आहेत आणि या स्पर्धांमध्ये खेळून, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुणीही खेळाडू आपल्या कुटुंबाचा आधार होऊ शकतो, ही खूप सकारात्मक गोष्ट असल्याचं सचिननं नमूद केलं.
येत्या मार्च महिन्यात (11 ते 28 मार्च) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी-20 मुंबई लीगचा थरार रंगणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, प्रोबॅबिलिटी स्पोर्ट्स आणि विझक्राफ्ट यांनी एकत्र येऊन ही लीग सुरू केलीय आणि सचिन तेंडुलकर त्याचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. या स्पर्धेत मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे सहा संघ तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी 1500 क्रिकेटपटूंनी नावं नोंदवली आहेत. त्यातून सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली जाणार आहे. एकेकाळी 'क्रिकेटची पंढरी' मानल्या जाणाऱ्या मुंबईला गतवैभव पुन्हा मिळावं, हा या लीगच्या आयोजनामागचा हेतू आहे.
देशाच्या क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेटचं मोठं योगदान राहिलंय. ही परंपरा कायम राखायची असेल, तर इथल्या मुलांना एक व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे. आम्ही आचरेकर सरांकडे शिकायचो, तेव्हा तुल्यबळ खेळाडूंसोबत खेळण्यासाठी सावंतवाडीला गेलो होतो. परंतु, या लीगमुळे मुंबईच्या मुलांना मुंबईतच, वानखेडे स्टेडियममध्येच आपली गुणवत्ता सिद्ध करता येऊ शकेल, असा विश्वास सचिन तेंडुलकरने व्यक्त केला. खेळाडूंना आर्थिक आधार देण्याचं कामही लीग स्पर्धा करत असल्याचं सांगत, त्यानं खेळाडूंना खेळात करिअर करण्याची सूचना केली.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी टी 20 मुंबई लीग यशस्वी होईल आणि क्रिकेटजगतावर मुंबईचा झेंडा फडकत राहील, असा विश्वास व्यक्त केला.
Web Title: T20 Mumbai League: choose sports as a career, there are many opportunities; says sachin tendulkar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.