दुबई : टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची मोहीम उपांत्य फेरीत संपुष्टात आली. टीम इंडियाला नमवलेल्या इंग्लंडने पुढे विश्वविजेतेपद पटकावले. मात्र, असे असले तरी बुधवारी जाहीर झालेल्या नव्या टी-२० क्रमवारीत भारताचे अव्वल स्थान कायम राहिले असून, विश्वविजे इंग्लंड ३ गुणांनी मागे, दुसऱ्या स्थानी आहेत. तसेच, फलंदाजीत भारताच्या सूर्यकुमार यादवनेही आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीत दमदार कामगिरी करत सूर्याने अव्वल स्थान पटकावले होते. यावेळी त्याने पाच डावांत तीन अर्धशतके झळकावली होती. या जोरावर त्याने ८६९ इतके सर्वोत्तम गुणही मिळवले. मात्र, उपांत्य सामन्यात १४ धावांवर बाद झाल्यानंतर त्याला दहा गुण गमवावे लागले. मात्र, तरीही त्याच्या अव्वल स्थानाला धक्का लागलेला नाही. भारताविरुद्धच्या इंग्लंडच्या दणदणीत विजयाचा शिल्पकार ठरलेल्या ॲलेक्स हेल्सने १२वे स्थान मिळवले आहे. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम हे पाकिस्तानचे हुकमी फलंदाज अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
गोलंदाजांमध्ये भारताच्या पदरी निराशा आली आहे. अव्वल दहांमध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही. भारताचा अव्वल टी-२० गोलंदाज ठरलेला भुवनेश्वर कुमार १४व्या स्थानी आहे. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि अर्शदीप सिंग अनुक्रमे २१व्या आणि २२व्या स्थानी आहेत. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा ७०४ गुणांसह अव्वल असून, त्यानंतर अफगाणिस्तानचा राशिद खान (६९८) आणि इंग्लंडचा आदिल राशिद (६९२) यांचा क्रमांक आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या इंग्लंडच्या सॅम कुरेनने दोन स्थानांनी प्रगती करत पाचवे स्थान मिळवले.
हार्दिकचे तिसरे स्थानअष्टपैलू खेळाडूंमध्ये बांगलादेशचा स्टार खेळाडू शाकिब अल हसनने २५२ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी २३३ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून, भारताचा हार्दिक पांड्या (२०३) तिसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (१८४) आणि नामिबियाच्या जे. जे. स्मित (१७४) यांचा क्रमांक आहे.
भारताचा दबदबा सांघिक क्रमवारीत वर्चस्व कायम राखताना भारतीय संघाने २६८ गुणांसह अव्वल स्थान राखले. यानंतर विश्वविजेते इंग्लंड २६५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. यंदा टी-२० विश्वचषकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या पाकिस्तानने २५८ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. यानंतर दक्षिण आफ्रिका (२५६) आणि न्यूझीलंड (२५३) यांचा क्रमांक आहे.