नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा फॉर्म आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० चा इतिहास लक्षात घेता रांची येथे शनिवारी होणा-या पहिल्या टी-२० लढतीत भारतच विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
झारखंड क्रिकेट संघटनेच्या मैदानावर टी-२० लढतीचे आयोजन होण्याची ही केवळ दुसरी वेळ असेल. मागच्यावेळी येथे पहिला टी-२० सामना झाला त्यावेळी भारताने श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केले होते. भारताने प्रथम फलंदाजी करीत १९६ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात लंका संघ ९ बाद १२७ धावांपर्यंतच मजल गाठू शकला होता. रविचंद्रन अश्विन आणि आशिष नेहरा यांनी त्या सामन्यात चमक दाखविली होती. दोघांनी संयुक्तपणे अर्धा संघ बाद केला. फलंदाजीत शिखर धवनने अर्धशतकी खेळी केली होती. नेहरा आणि धवन हे सध्याच्या संघात कायम आहेत.
भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांवर नजर टाकल्यास भारताचे पारडे जड आहे. सध्याचा आॅस्ट्रेलिया संघ ज्या पद्धतीने खेळत आहे ते बघून रांचीत विजयाची शक्यता कमीच वाटते. उभय संघांदरम्यान आतापर्यंत १३ टी-२० लढती झाल्या. त्यापैकी भारताने नऊ सामने जिंकले तर चार सामने गमावले. यापैकी तीन सामने भारताने घरच्या मैदानावर खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात भारतानेच सरशी साधली हे विशेष.
रांचीचे मैदान महेंद्रसिंंग धोनीसाठी ‘खास’ आहे. त्याचे हे होमग्राऊंड असून २०१६ मध्ये लंकेविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात मात्र घरच्या प्रेक्षकांपुढे चमक दाखविण्याची संधी त्याला मिळू शकली नव्हती. पण यावेळी धोनीला संधी मिळेल आणि आम्हाला त्याचे ‘हेलिकॉप्टर शॉट’ पहायला मिळतील, अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
Web Title: T20 series: India will be the contender for the win in Ranchi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.