फ्लोरिडा : वेस्ट इंडिजविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या चौथ्या तसेच पाचव्या सामन्यात बाजी मारण्यासह मालिका खिशात घालण्याचे लक्ष्य टीम इंडियाने आखले आहे. यानिमित्त आगामी टी-२० विश्वचषकासाठी संघ निवडीला देखील बळकटी देता येणार आहे.
मालिकेत भारताकडे सध्या २-१ अशी आघाडी आहे. अमेरिकेतील प्रेक्षकांपुढे अखेरचे दोन सामने खेळले जाणार असून, या दोन्ही सामन्यात श्रेयस अय्यर कसा खेळतो, याकडेही लक्ष असेल. विश्वचषकाच्या संघात श्रेयसला स्थान मिळणे कठीण होत चालले आहे. दीपक हुड्डाने मात्र संधीचा पुरेपूर लाभ घेतला. त्यामुळे मधल्या फळीत श्रेयसला स्थान मिळेलच याची खात्री नाही.
मागच्या सामन्यात अप्रतिम फटकेबाजीमुळे सर्वांना प्रभावित करणारा सूर्यकुमार यादव याला कर्णधार रोहित हा आघाडीच्या फळीत खेळविण्यास इच्छुक दिसतो. तिसऱ्या सामन्यात रोहितच्या पाठीत दुखणे उमळताच त्याला मैदान सोडावे लागले होते. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर तो खेळण्यास सज्ज आहे. रोहितची नजर फलंदाजांच्या कामगिरीकडे असेल तर, ऋषभ पंत शैलीदार फटकेबाजीच्या बळावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास इच्छुक दिसतो. आवेश मागील दोन सामन्यात प्रभावी ठरला नव्हता. तरीही तो संघात असेल कारण हर्षल पटेल बरगड्यांच्या दुखण्यातून सावरलेला नाही. हर्षल फिट नसल्याने भारतीय संघ अतिरिक्त फिरकीपटूसह खेळू शकतो. अशावेळी आतापर्यंत संधी मिळू न शकलेला कुलदीप यादव मैदानावर दिसणार का, याचीही उत्सुकता आहे.
आशिया चषक संघात लोकेश राहुल आणि विराट कोहली यांचे पुनरागमन होईल, त्यावेळी श्रेयसला बाहेर बसावे लागू शकते. त्याने तीन सामन्यात शून्य, ११ आणि २४ धावा केल्या. वेगवान आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंपुढे तो डळमळतो. राहुल द्रविड यांनी कोचपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सर्वच खेळाडूंना पुरेशी संधी दिली जात आहे, मात्र श्रेयस हा वनडेच्या तुलनेत टी-२० त अपयशी ठरला.द्रविड यांनी मागच्या अडीच महिन्यात श्रेयसला नऊ टी-२० सामने खेळण्याची संधी दिली. त्याला सुरुवातीच्या दहा षटकात खेळण्याची संधीही मिळाली, तरी तो एकही अर्धशतक ठोकू शकला नव्हता. श्रेयसला अखेरच्या दोन सामन्यात संधी मिळाली तर मोठी खेळी करण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नसावा.