Join us  

टी-२० मालिका: बुमराहसह युवा क्रिकेटपटू दाखवणार दम; आजपासून आयर्लंडविरुद्ध भिडणार

तीन सामन्यांच्या या मालिकेत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 10:14 AM

Open in App

डब्लिन : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये आयपीएलमध्ये चमकलेले युवा क्रिकेटपटू शुक्रवारपासून आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून आपली क्षमता सिद्ध करतील. यावेळी सर्वांची नजर तब्बल ११ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर असेल. तीन सामन्यांच्या या मालिकेत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत नक्कीच आयपीएलमध्ये चमकलेल्या ऋतुराज न गायकवाड, रिंकू सिंग, जितेश शर्मा, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा वा खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असेल. मात्र, या मालिकेत आकर्षणाचे केंद्र ठरणार तो बुमराह. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बुमराहच्या कंबरेत दुखापत झाली होती. यानंतर शस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर राहिला होता. या मालिकेत पाच दिवसांमध्ये त्याला जास्तीत जास्त १२ षटके गोलंदाजी करायची आहे. यामुळे याद्वारे त्याच्या तंदुरुस्तीविषयी पूर्ण माहिती राष्ट्रीय निवडकर्ते आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला मिळेल. त्यामुळे ही मालिका बुमराहसाठी सर्वात मोठी परीक्षा ठरणार आहे.

आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेतून बुमराहला आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी चांगली तयारी करण्याची संधीही मिळणार आहे. त्याचप्रमाणे बुमराह आणि संजू सॅमसन या दोघांचा अपवाद वगळता संघातील इतर सर्व खेळाडू यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळतील. त्यामुळे त्यांनाही या मालिकेतून चांगली तयारी करण्याची संधी मिळेल. यामध्ये रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांच्यावर सर्वांचे लक्ष राहील. त्याचप्रमाणे, पुनरागमन करणारा प्रसिद्ध कृष्णा याकडेही विशेष लक्ष राहील. तोही बुमराहप्रमाणे दुखापतीतून पुनरागमन करत आहे.

भारताविरुद्ध स्टेडियम हाऊसफुल्ल

क्रिकेटविश्वात भारतीय खेळाडूंच्या असलेल्या क्रेनमुळे क्रिकेट आयर्लंडला मोठा फायदा झाला आहे. भारत आयर्लंड यांच्यातील पहिल्या दोन टी-२० सामन्यांच्या सर्व तिकिटांची विक्री झाल्याची माहिती क्रिकेट आयर्लंडने दिली आहे. क्रिकेट आयर्लंडने आपल्या संकेतस्थळावर माहिती दिली की, भारत-आयर्लंड पहिल्या दोन टी- २० सामन्यांची सर्व तिकिटे विकले गेली असून, तिसऱ्या सामन्याच्या तिकिटांचीही जोरदार विक्री सुरु आहे.' या तीन सामन्यांच्या मालिकेतील सर्व लढती मालाहाइड क्रिकेट क्लबच्या मैदानावर रंगणार असून, येथील प्रेक्षक क्षमता १२ हजार ५०० इतकी आहे. २००९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडला नमवल्यानंतर भारताने आतापर्यंत आयर्लंडविरुद्ध खेळलेल्या सर्व पाच सामन्यांत बाजी मारली आहे. आयर्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज लॉरकन टकरने म्हटले की, मोठा संघ खेळण्यासाठी येत असल्याने विशेष अनुभव आहे. 

येथे भारताला मोठा पाठिंबा मिळेल, पण इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानात येणार असल्याने हे आयर्लंड क्रिकेटसाठी खूप चांगले ठरणार आहे. आमचा संघ या मालिकेसाठी रोमांचित आहे. आम्ही विश्वचषक स्पर्धा खेळली. असून भारताविरुद्ध याआधीही खेळलो आहोत. त्यामुळे दडपणात कसे खेळायचे असते याची आम्हाला कल्पना आहे. आयर्लंड संघातील प्रत्येक खेळाडू रोमांचित आहे.

आयर्लंडला गृहीत धरता येणार नाही

आयर्लंड संघाने टी-२० क्रिकेटमध्ये अनेक आघाडीच्या संघांना झुंजवले असल्याने त्यांना गृहीत धरण्याची चूक भारतीयांना महागात पडू शकते. कर्णधार अँड्रयू बालवर्ती, हॅरी टेक्टर, लॉरकन टकर, मार्क एडेर, जोश लिटल, जॉर्ज डॉकरेल यांसारख्या खेळाडूंकडून भारताला कडवी टक्कर मिळेल. भारताविरुद्ध आयर्लंडला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नसला, तरी भारतीय युवा खेळाडूंना एकही चूक करणे महागात पडू शकते. 

प्रतिस्पर्धी संघ: भारत जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि आवेश खान.

आयर्लंड : अँड्र्यू बालबनीं (कर्णधार), हॅरी टेक्टर, लॉरकन टकर, रॉस एडेर, मार्क एडेर, कुर्टिस कॅम्फर, जेरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल. फियोन हँड, जोश लिटल बॅरी मैकार्थी, बेन व्हाइट, क्रेग यंग आणि थियो वान वोरकोम.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयर्लंडटी-20 क्रिकेट
Open in App