मुंबईः चेंडू कुरतडण्याचं 'पाप' केल्यानं जगात नाचक्की झालेल्या आणि गर्दीतून गर्तेत फेकल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी मुंबईतून एक दिलासादायक बातमी आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघानं टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात तीन विक्रम रचले आहेत. त्यांनी टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या रचून दक्षिण आफ्रिकेला मागे टाकलंय.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडसमोर २०९ धावांचा डोंगर उभा केला. महिला टी-२० क्रिकेटमध्ये २००चा आकडा पार होण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँड्सविरुद्ध २०५ धावा फटकावल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत चौकारांचा अक्षरशः पाऊस पाडला आणि पुरुष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही ते महिलांनी करून दाखवलं. त्यांनी तब्बल ३२ चौकार लगावले. हा पराक्रम कुठल्याच संघाला करता आलेला नाही. श्रीलंकेच्या पुरुष संघाने जोहान्सबर्गमध्ये केनियाविरुद्ध ३० वेळा चेंडू सीमेपार धाडला होता.
ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगने ४५ चेंडूत नाबाद ८८ धावा तडकावल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एवढी मोठी खेळी कुणालाच करता आलेली नाही.
ऑस्ट्रेलियानं विजयासाठी दिलेलं २१० धावांचं आव्हान इंग्लंड संघाला पेलवलं नाही. २० षटकांत त्यांना १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि ऑस्ट्रेलियानं ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.