मुंबई : सलामीवीर फलंदाज डॅनियली वॅटच्या आक्रमक शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंड महिला संघाने रविवारी टी-२० तिरंगी मालिकेतील दुसऱ्या लढतीत विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा ७ गडी राखून पराभव केला.
सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना (४० चेंडू, ७६ धावा) आणि मिताली राज (४३ चेंडू, ५३ धावा) यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर यजमान संघाने २० षटकांत ४ बाद १९८ धावांची दमदार मजल मारली होती.
टी-२० क्रिकेटमधील भारतीय महिला संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना डॅनियलीने ६४ चेंडूंना सामोरे जाताना १५ चौकार व ५ षटकारांच्या साहाय्याने १२४ धावांची शानदार खेळी करीत पाहुण्या संघाला ८ चेंडू राखून लक्ष्य गाठून दिले.
त्याआधी, महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रमही इंग्लंडच्या नावावर होता. त्यांनी २०१७ मध्ये कॅनबरामध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला होता.
डॅनियलीने पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकत आपला निर्धार स्पष्ट केला. तिने ब्रायोनी स्मिथसोबत (१५) सलामीला ६१ धावांची भागीदारी केली. वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने ब्रायोनीला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. इंग्लंडने पॉवरप्लेमध्ये १ बाद ६७ धावांची मजल मारली होती. पॉवर प्लेनंतरही डॅनियलीने आक्रमकता कायम राखत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. तिने २४ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले तर ५२ चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घातली.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे तिचे दुसरे शतक आहे. तिला तमसिन ब्युमोंटची (२३ चेंडू, ३५ धावा) चांगली साथ लाभली. ब्युमोंटसोबत तिने दुसºया विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करीत इंग्लंड संघाचा विजय निश्चित केला. (वृत्तसंस्था)
भारत २० षटकांत ४ बाद १९९ धावा, मिताली राज झे.गुन गो. फॅरान्ट ५३, स्मृती मंधाना झे. तमसिन ब्युमोंट गो स्किव्हर ७६, हरमनप्रीत कौर गो फॅरान्ट ३०, वेदा कृष्णमूर्ती झे. इस्केलस्टोन ३, पुजा वस्त्रकार नाबाद २२, अनुजा पाटील नाबाद २, अंवातर १२. गोलंदाजी : तॅश फॅरान्ट ४-०-३२-२, सोफी इस्केस्टोन ४-०-२९-१, नताली स्किव्हर २-०-२४-१,
इंग्लंड: २० षटकांत ३ बाद १९९ धावा डॅनियली वॅट झे. कृष्णमूर्ती गो. शर्मा १२४, ब्रियोनी स्मिथ गो.गोस्वामी १५, तमसिन ब्युमोंट झे. मानधना गो. शर्मा ३५, नताली स्किव्हर नाबाद १२, हिदर नाईट नाबाद ८. अवांतर ५, गोलंदाजी - झुलन गोस्वामी ३.४-०-३२-१, अनुजा पाटील ३-०-४०-०, पूजा वस्त्रकार ३-०-३६-०, पूनम यादव ३-०-३५-०, हरमनप्रीत कौर २-०-२०-०, दीप्ती शर्मा ४-०-३६-२
Web Title: T20 Tricolor Series: Daniel Wyatt's century, England won
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.