ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ ला सुरुवात झाली आहे. स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ ५ तारखेला आयर्लंडविरूद्धच्या सामन्याने विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात करेल. सराव सामन्यात बांगलादेशचा दारूण पराभव केल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. पण, आयर्लंडसारख्या नवख्या संघाला हलक्यात घेऊन चालणार नाही हे स्पर्धेतील सर्वच संघ जाणून आहेत. अलीकडेच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती.
भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका हे संघ अ गटात आहेत. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. अमेरिकेतील काही सराव सामने पावसामुळे धुवून निघाले. भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यावर देखील पावसाचे सावट असेल का अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. जर एखादा सामना रद्द झाल्यास त्याचा गुणतालिकेत मोठा प्रभाव पडू शकतो.
न्यूयॉर्कमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचे सामने आयोजित आहेत, पण काही सराव सामने पावसाच्या कारणास्तव रद्द करावे लागले. मात्र, भारत आणि आयर्लंड यांच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा भारतीय चाहत्यांसाठी सुखद धक्का म्हणावा लागेल.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.
विश्वचषकातील भारताचे सामने -५ जून - भारत विरूद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क९ जून - भारत विरूद्ध पाकिस्तान. न्यूयॉर्क१२ जून - विरूद्ध अमेरिका, न्यूयॉर्क१५ जून - विरूद्ध कॅनडा, फ्लोरिडा