Join us  

T20 WC 24 : भारतासमोर आज कांगारूंचे आव्हान; विजयासह उपांत्य फेरी गाठण्याचे रोहितसेनेचे लक्ष्य

फलंदाजांवर जबाबदारी; विजयासह उपांत्य फेरी गाठण्याचे भारताचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 8:52 AM

Open in App

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 

अफगाणिस्तानच्या ऑस्ट्रेलियावरील सनसनाटी विजयानंतर या टी-२० विश्वचषकाने रोमांचक वळण घेतले आहे. या अनपेक्षित विजयानंतर सुपर आठमधील ग्रुप १ मधील स्थितीही रोमांचक झाली आहे. भारताच्या खात्यात ४ गुण असून ते जवळपास उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान यांचे प्रत्येकी २ गुण आहेत. आता या गटात भारत-ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान- बांगलादेश हे सामने रंगणार आहेत.

ऑस्ट्रेलियाने जर भारताला नमवले, तर चार गुणांसह त्यांची स्थिती भक्कम होईल. त्याचवेळी अफगाणिस्तानने बांगलादेशला नमवले, तर त्यांचेही चार गुण होतील. अशा परिस्थितीत संघांची धावगती निर्णायक ठरेल. आकडेवारी पाहता भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित मानले जात आहे. कारण, भारताची धावगती भक्कम आहे. ऑस्ट्रेलियाची धावगतीही ठीकठाक आहे. पण, अफगाणिस्तानला धावगती मोठ्या सुधारण्यासाठी विजयाची आवश्यकता आहे. 

कांगारू दडपणाखालीऑस्ट्रेलियाचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध पराभव पत्करून भारताविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक दडपण नक्कीच असणार. पण, आयसीसी स्पर्धामधील ऑस्ट्रेलियाची कामगिरी आणि दडपणाच्या स्थितीत खेळण्याची त्यांची क्षमता याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळे भारतीय संघ नक्कीच पूर्ण ताकदीने या सामन्यात खेळेल.

संघाचे गणित जुळलेआतापर्यंतची विशेष करून बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील कामगिरी पाहता भारतीय संघाला आपल्या संघाचे गणित कळले असून हा संघ आता भक्कम आणि समतोल दिसत आहे. कुलदीप यादव संघात आल्यानंतर गोलंदाजी अधिक भेदक झाली, वेस्ट इंडीजमधील खेळपट्टी लक्षात घेऊन तीन फिरकीपटूंसह भारतीय संघ खेळला आणि तिन्ही फिरकीपटू यशस्वी ठरले आहेत. रवींद्र जडेजाकडून निश्चित अजून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. अक्षर पटेलने मात्र छाप पाडली असून कुलदीपने आपली उपयुक्तता सिद्ध केली. जसप्रीत बुमराह भारताचा ट्रम्प कार्ड असून त्याच्या क्षमतेबद्दल, त्याच्या उपस्थितीबद्दल अजून बोलण्याची गरज वाटत नाही. तो भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ आहे. अर्शदीप सिंगनेही शानदार मारा केला आहे. 

भारतीय गोलंदाज घेणार परीक्षासामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्टस लाइव्ह स्ट्रिमिंग : डिस्नी हॉटस्टार... आतापर्यंत भारतीय फलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. भारतीय संघाची फलंदाजी निश्चित खोलवर आहे, पण त्यात सातत्य दिसून येत नाही. हेच ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या बाबतीतही दिसून आले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध ट्रॅविस हेड झटपट बाद झाला, मिचेल मार्शचा फॉर्म गायब झाला आहे. मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, पण त्यांच्यात सातत्य नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजांपुढे या सर्वांची मोठी परीक्षा होईल.

फलंदाजांवर अधिक जबाबदारीभारताच्या फलंदाजीबाबत म्हणायचे, तर रोहित शर्मा-विराट कोहली यांच्याकडून भारताला चांगली सलामी मिळालेली नाही. कोहलीला आपल्या जुन्या अंदाजात खेळावे लागेल. कोहली फॉर्ममध्ये आहे, केवळ त्याच्याकडून मोठी खेळी होत नाहीय. ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव यांनी छाप पाडली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्या सर्वोच्च स्तराचा खेळ करत आहे. शिवम दुबेनेही काही उपयुक्त फटकेबाजी केली आहे. त्यामुळे भारतीय संघ अत्यंत भक्कम दिसत आहे. परंतु, समोर ऑस्ट्रेलिया संघ आहे, ही गोष्टही विसरता कामा नये. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघ