rishabh pant news : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना आफ्रिकेला निसटता पराभव पत्करावा लागला. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने केलेली अप्रतिम कामगिरी... आणि सूर्यकुमार यादवने सीमारेषेजवळ डेव्हिड मिलरचा घेतलेला झेल भारताला विजय मिळवून देऊन गेला. मात्र, काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने या सामन्याबद्दल एक मोठा खुलासा केला होता. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या मास्टरप्लॅनमुळे सामना जिंकण्यात मदत झाली असल्याचे रोहितने नमूद केले. दरम्यान, आता रिषभ पंतने सर्व घटनाक्रम सांगितला.
वेस्ट इंडिजच्या धरतीवर झालेल्या या सामन्यात भारताने निसटता विजय मिळवून भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. अखेरच्या षटकांत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. हार्दिक पांड्याच्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर मिलरने मोठा फटका मारला. पण, सीमारेषेजवळ उभा असलेल्या सूर्याने मोक्याच्या क्षणी भारी झेल घेऊन आफ्रिकेला मोठा झटका दिला. मग भारताने विश्वचषक उंचावला. सूर्याने अंतिम सामन्यात घेतलेला झेल आजतागायत भारतीयांच्या मनात ताजा आहे. बार्बाडोसवरुन टीम इंडिया भारतात परतल्यानंतर त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. अलीकडेच विश्वविजेत्या संघातील शिलेदार प्रसिद्ध अशा कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले. यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांनी भन्नाट किस्से सांगून उपस्थितांचे मनोरंजन केले. रोहितने रिषभ पंतबद्दल एक मोठा खुलासा करुन सर्वांचे लक्ष वेधले याबद्दल आता पंतने भाष्य केले.
रिषभ पंत मिश्किलपणे म्हणाला की, मी फिजिओला वेळ घालवायला सांगितले. त्यावेळी आम्हाला थोडा वेळ वाया घालवायला हवा होता. फिजिओने मला विचारले की, तुझा गुडघा ठीक आहे का? त्यावर मी सांगितले की, सगळे ठीक असून मी फक्त नाटक करत आहे. पंतने 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलताना हा खुलासा केला.
रोहित काय म्हणाला?
रोहितने रिषभचा किस्सा सांगताना म्हटले की, कोणालाच ही गोष्ट माहिती नाही की, ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना एक छोटा ब्रेक झाला होता... तेव्हा रिषभ पंतने शक्कल लढवत सामना स्लो करण्यासाठी एक नाटक केले होते. गुडघ्याला काहीतरी लागले असल्याचे सांगत त्याने सामना थांबवून ठेवला. मी फिल्डिंग सेट करत असताना पंत खाली बसला असल्याचे निदर्शनास आले. फिजिओ आणि त्यांचे सहकारी मैदानात आले होते. क्लासेन सामना कधी सुरू होणार याची वाट पाहत होता... यामुळेच आमचे काम सोपे झाले असे मी म्हणणार नाही पण हे एक कारण नक्कीच असू शकते.